मुंबई : अभिनेत्री कंगणा राणावतचा ‘टीकू वेड्स शेरू’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या मुख्य भूमिका आहेत. मात्र या चित्रपटातील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला घेण्याचा कोणताही विचार नव्हता. नवाजुद्दीनच्या जागी अभिनेता इरफान खान यांना घेतले जाणार होते. मात्र त्यांचे निधन झाले, असा खुलासा कंगणाने एका मुलाखतीत केला आहे.
एका मुलाखतीदरम्यान कंगणाने सांगितले की, “हा सिनेमा माझ्यासाठी खूपच खास आहे. ही गोष्ट मी आतापर्यंत कुणालाही सांगितलेलं नाही. हा सिनेमा आधीच प्रदर्शित झाला होता. काही वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे सहा-सात वर्षांपूर्वी मी आणि इरफान सर हा सिनेमा करत होतो. त्यावेळी या सिनेमाचं नाव डिवाइन लवर्स होतं. दुर्दैवानं माझे दिग्दर्शक आजारी पडले. त्यानंतर आम्ही पुढचे दोन-तीन वर्षे सिनेमा करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही.”
पुढे ती म्हणाली की, “हा सिनेमा करायचे ठरले, तेव्हा सगळ्यात आधी इरफान खान यांना विचारण्यात आले होते. या सिनेमासाठी त्यांनी होकार ही दिला होता. परंतु दुर्दैवाने त्याचे निधन झाले. त्यानंतर या भूमिकेसाठी नवाज सरांचा नंबर मी शोधत होते. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ते बेंगळुरूला आहेत. मी त्यांना भेटायला तिकडे गेले. तिथं गेल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटले.”
“तेव्हा ते मला म्हणाले तू इकडे आली. त्यावर मी त्यांना म्हटलं की, हो मी आले. हे सिनेमाचं स्क्रिप्ट आहे. तेव्हा ते म्हणाले की, तू इतक्या लांबून आली तर मी स्क्रिप्ट न वाचताच हा सिनेमा करायला तयार आहे.”अशा पद्धतीने ‘टीकू वेड्स शेरू’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यांची एंट्री झाली. दरम्यान, ‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटाची निर्मिती कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्सने केली आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ मध्ये अभिनेता पहिल्यांदाच अवनीत कौरबरोबर काम करणार आहे. हा चित्रपट 23 जूनला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.