मंचर, अवसरी, लौकी, घोडेगांव परिसरात काढणी होणार सुरू
मंचर- मंचर, घोडेगांव लौकी, चांडोली, अवसरी, निरगुडसर, पिंपळगाव, रांजणी, थोरांदळे परिसरातील उन्हाळी हंगामातील बाजरीचे पीक फुलोऱ्यात आले असून, 15 दिवसांनंतर बाजरी काढणीची कामे सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा 28 ते 30 रुपये किलोप्रमाणे बाजरीला बाजारभाव मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या उन्हाची तीव्रता अधिक असूनही विहीर व बोअरवेलच्या पाण्यावर, खत वेळेवर देऊन, खुरपणी करून पिकांची चागंल्या प्रकारे निगा राखल्याने मंचर परिसरातील अनेक गावांतील बाजरी डौलदार फुलली आहे. बाजरीचे पीक हिरवेगार दिसत असून फुलोऱ्यात आले आहे, तर उत्पन्नही चागंल्या प्रकारे मिळणार असल्यामुळे शेतकरी सकाळी व दुपारी पिकाची राखण करण्यात व्यस्त आहेत. काही ठिकाणी काढणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. उन्हाळी बाजरीपासून मिळणारे धान्य पावसाळी बाजरीपेक्षा चांगल्या दर्जाचे मिळते, तसेच उन्हाळी बाजरीपासून मिळणारी वैरण देखील चांगल्या प्रतीची मिळते. शेतकऱ्यांचा जोडधंदा दूध व्यवसाय असल्यामुळे उन्हाळी बाजरी घेण्यावर शेतकरी जास्त भर देतो.
फुलोऱ्यात आलेल्या बाजरी पिकाचे पक्ष्यांपासून संरक्षण होण्यासाठी रंगीबेरंगी पट्ट्या लावून कणसाचे रक्षण करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर शेतकरी बाजरी पिकाची राखणी करताना दिसत आहेत. गोफण, आसूड तसेच रिकामे डबे वाजवून पक्ष्यांना हुसकावून लावण्याचे काम करताना शेतकरी दिसत आहेत.