नवी दिल्ली – करोना विषाणूविरोधात जगभरातल्या जवळपास 100 पेक्षा जास्त औषध कंपन्या लस तयार करत आहेत. यातील अमेरिका आणि चीनमधील औषध कंपन्यांची लस परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील एका कंपनीच्या लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे तर चीनमधील कंपनीने आपली लस 99 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे.
चिनी कंपनी सिनोवॅक बायोटेकने तयार केलेल्या लसीचे जवळपास एक हजारपेक्षा जास्त लोकांवर वैद्यकीय चाचणी सुरू आहे. आता या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ब्रिटनमध्ये केली जाणार आहे. त्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले आहे. शास्त्रज्ञांनी ही लस 99 टक्के प्रभावी ठरेल असा दावा केला आहे. कंपनी बीजिंगमध्ये तयार केली जात आहे, तिथे जवळपास दहा कोटींपेक्षा जास्त डोस तयार केले जातील.
करोनाचा जास्त धोका असलेल्या रुग्णांवर सर्वात आधी याचा प्रयोग होणार आहे.
तर अमेरिकेतील मॉडर्ना इंक डॉट कंपनीने आपल्या लसीची पहिली चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितले आहे. या लसीमुळे शरीरात अँटिबॉडीज तयार होत आहेत. लसीची चाचणी वेगवेगळ्या स्तरावर होत आहे. सिएटलमध्ये 45 निरोगी व्यक्तींवर या लसीचे परीक्षण करण्यात आले. त्यावेळी त्यांना कमी मात्रेचे 2 डोस देण्यात आले आणि त्यावेळी त्यांच्या शरीरात करोनाविरोधात लढणारी अँटिबॉडीज दिसून आल्या आहेत.
विषाणूरोधक म्हणून अविफावीरला रशियाकडून मंजुरी
रशियाने अविफावीर या औषधाला विषाणूरोधक म्हणून मंजुरी दिली आहे. ही भारतासाठी विशेष आनंदाची बाब आहे. कारण हे औषध इन्फ्लूएन्झावर यापूर्वीच उपलब्ध असलेल्या औषधावर आधारलेले आहे. या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत, असे संशोधकांनी म्हटले आहे.
अविफावीर हे फवीपिरवीरमधून घेतले गेले आहे. फवीपिरवीरच्या भारतात तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत, असे मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. वैद्यकीय चाचण्यांदरम्यान अविफावीरने करोनाच्या रुग्णांवरच्या
उपचारादरम्यान उच्च कार्यक्षमता दर्शविली आहे, असे “रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’ने सोमवारी सांगितले होते. जून महिन्यात या औषधाचे 60 हजार कोर्स दिले जाणार आहेत.