मुंबई – अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे हे नवीन वर्षात लोच्या करायला पूर्णपणे सज्ज झाले आहेत. कारणच तसे आहे. प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा ‘लोच्या झाला रे’ हा चित्रपट ४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा धमाकेदार कौटुंबिक चित्रपट तुफान विनोदी असेल असे दिसतेय. मुळात हे चारही कलाकार पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार असून कोणामुळे कोणाच्या आयुष्यात लोच्या होणार आहे, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
या टीझरमध्ये अंकुश, सिद्धार्थ व वैदेही यांच्यात चाललेला गोंधळ दिसून येत आहे. एकीकडे विजय पाटकर यांची जुगलबंदी तर दुसरीकडे सयाजी शिंदे व रेशम टीपणीस यांचा रोमान्स पाहायला मिळत आहे.
पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यापूर्वी पारितोष पेंटर यांनी ‘धमाल’, ‘टोटल धमाल’ अशा बॉलिवूडच्या चित्रपटांचे लेखन केले आहे. संजय मेमाणे यांनी ‘लोच्या झाला रे’चे छायाचित्रण केले असून त्यांनी याआधी ‘झिम्मा’, ‘हिरकणी’, ‘हाफ तिकीट’ अशा सुपरहिट चित्रपटांच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली होती.