नोयडा येथील “मिहिर’लाही टॉप 500’मध्ये स्थान
पुणे – जगातील सर्वाधिक वेगवान महासंगणकाच्या यादीत भारतातील “प्रत्युष’ आणि “मिहिर’ या दोन महासंगणकांना अनुक्रमे 56 आणि 100 वे स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे “प्रत्युष’ हा पुण्यातील भारतीय उष्णकटीबंधीय हवामान संस्थेत (आयआयटीएम) कार्यरत आहे. मात्र, या यादीत सर्वोच्च 30 मध्ये स्थान मिळविण्याची अपेक्षा पूर्ती करण्यात या महासंगणकांना यश आलेले नाही.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या “टॉप 500′ या जगातील सर्वाधिक वेगवान संगणकाच्या यादीत जगभरातील वेगवान संगणक आणि संगणक प्रणाली यांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. दर दोन वर्षांनी ही यादी प्रकाशित केली जाते. या यादीत अमेरिका आणि चीन या देशांनी आपले वर्चस्व गाजविले आहे.
अमेरिकेचा “समिट’ आणि “सिएरा’ हे महासंगणक अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थावर आहेत. तर चीनचा “सनवे ताइहूलाइट’ हा महासंगणक तृतीय स्थानावर आहे. भारताचा “मिहिर’ हा महासंगणक नोएडा येथील “नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट’ या संस्थेत कार्यरत आहेत. भारतात प्रथमच बनवण्यात आलेले “मल्टी पेटा फ्लॉप’ प्रकारातील हे दोन्ही महासंगणक 2018 साली कार्यरत झाले असून, यांची किंमत तब्बल 438 कोटी रुपये इतकी आहे. प्रामुख्याने हवामान बदल, मान्सूनचे आगमन आणि हवेची गुणवता यासंदर्भात काम करण्यासाठी या महासंगणकाचा वापर केला जातो.
या महासंगणकांचे कार्य हे अतिशय चांगले असून, त्यामुळे हवामान आणि वातावरणसंदर्भातील अभ्यासासाठी अधिक सविस्तर आणि स्पष्ट माहिती मिळण्यास मोलाची मदत मिळते. जगातील “टॉप 500′ महासंगणकांच्या यादीत स्थान मिळणे ही अभिमानाची बाब असल्याची भावना “आयआयटीएम’ प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.