लोणी धामणी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी बाजरी जोमात आली आहे. बऱ्यापैकी पोषक हवामान असल्यामुळे उन्हाळी बाजरी फुलोऱ्यात आली आहे.
या भागात निरगुडसर, जारकरवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव, वाळुंजनगर परिसरात उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. धान्य आणि जनावरांसाठी चारा देणारे पीक म्हणून हे पीक घेतले जाते. कडक उन्हामुळे पक्ष्यांना अन्न उपलब्ध नसल्यामुळे बाजरीवर चिमण्या व अन्य पक्षी ताव मारत आहेत.
त्यांना आवरण्यासाठी शेतकरी कापडाची बुजगावणी, रेडियम पट्ट्या लावून पिकांची राखण करीत आहेत. सहजासहजी उन्हाळी बाजरीचे पीक कोणत्याही रोगास बळी पडत नाही. उन्हाळ्यात बाजरी पिकाला मिळेल तेवढे पाणी द्यावे लागते.
सध्या या परिसरात डिंभेच्या उजव्या कालव्याला पाणी सुरू असल्यामुळे कालव्याच्या आजूबाजूला असणाऱ्या विहिरींची पाणी पातळी चांगली आहे. उन्हाळी बाजरीला इतर काही खर्च नसल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते आणि उत्पन्नही चांगले मिळते आहे.