सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षात १४२ जणांना दाखल करण्यात आले आहे. तर ६७ जणांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी दोन पाँझिटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण. रुग्णसंख्या १२१ झाली आहे.
सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात ठाणे येथून प्रवास करुन आलेला एक 20 वर्षीय युवक व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणारा 29 वषीय पुरुष असे एकूण 2 जणांचे अहवाल करोनाबाधित (कोविड-19 ) आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील २६, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ५, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील १९ व कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील १७ अशा एकूण ६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ९ व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात १३३ अशा एकूण १४२ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या १२१ झाली असून यापैकी ८४ जणांवर उपचार सुरू आहेत. ३५ जण करोनामुक्त होवून घरी गेले. दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.