भवानीपेठेचा कालावधी सर्वाधिक 1100 दिवसांवर
पुणे – तब्बल आठ महिन्यानंतर शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. मात्र, ही संख्या कमी होतानाच, आणखी एक दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे.
शहरातील बाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सुमारे 437 दिवसांवर गेला आहे. तर शहरातील रुग्णसंख्या अशीच कमी राहिल्यास आणि नागरिकांकडून सामाजिक अंतरासह आता घेत असलेली खबरदारी दिवाळीच्या कालावधीतही कायम ठेवल्यास नोव्हेंबरअखेर शहरातील रुग्णसंख्या नगण्य असेल, असा विश्वासही आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
शहरात मार्च महिन्यात सुरू झालेला करोनाच्या नवीन बाधितांचा आलेख अखेर आठ महिन्यांनंतर उतरणीस लागला आहे. शहरात मार्च महिन्यात रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी टप्प्याटप्प्याने रुग्ण वाढतानाच, 40 ते 56 दिवसांवर गेला होता. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हा कालावधी पुन्हा 20 ते 30 दिवसांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.
शहरातील शासकीय हॉस्पिटल तसेच खासगी रुग्णालयातही रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले होते. मात्र, त्यानंतर आता करोनाचा नव्याने बाधित होण्याचा आकडा उतरणीस लागला आहे. सध्या दिवसाला नव्याने सापडत असलेली रुग्ण कायम राहिल्यास हे रुग्ण दुप्पट होण्यास 437 दिवसांचा कालावधी लागेल.