प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 -गणेशमूर्ती विसर्जनासाठी यंदा महापालिकेकडून शहरात 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 150 फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या 11 दिवसांत पाच ते साडेपाच लाख गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. यंदा नव्या गावांच्या समावेशाने ही संख्या वाढणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मागील दोन वर्षे करोनामुळे महापालिकेने शहरात सार्वजनिक ठिकाणचे विसर्जन घाट गर्दी टाळण्यासाठी बंद ठेवले होते. तसेच पालिकेने शहरात अनेक ठिकाणी विसर्जनासाठी लोखंडी टाक्यांची सुविधाही दिली नव्हती.
पालिका गेल्या दोन वर्षांपासून शहरात फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा उपलब्ध करून देते. या हौदांचे नियोजन क्षेत्रीय कार्यालयनिहाय करून गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसापासून ते शहरात फिरणार आहे.