प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 -पुणे शहरामध्ये 5 पैकी 4 लोकांना म्हणजे 80 टक्के लोकांना मानसिक आरोग्याच्या समस्यांचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनुभव आला आहे. पुण्यातील 85 टक्के स्त्रिया आणि 70 टक्के पुरुषांना या समस्येचा सामना करावा लागला आहे. विशेषतः महिलांमध्ये तणाव हे सामान्य कारण बनले आहे. याशिवाय पुण्यातील पुरुषांमध्ये चिंतेची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. “एम्पॉवर’ या आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टने “मानसिक आरोग्य स्कोअर’अंतर्गत शहरात
सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढला आहे.
शहरातील 18 ते 24 वयोगटांतील 88 टक्के तरुणांना मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत. त्यांच्यात तणाव, मनःस्थिती बिघडणे आणि चिंता या प्रमुख समस्या आहेत. सुमारे 80 टक्के निद्रानाशाचा त्रास सहन करत आहेत. पॅनिक डिसऑर्डर, अस्थिरता, नातेसंबंधातील समस्याही त्यांना भेडसावताहेत. “सोशल मीडिया’वर जास्त वेळ घालवल्यामुळे सुमारे 5 टक्के तरुणांना “बॉडी डिसमॉर्फिक’ची समस्या आहे.
“आयटी’त प्रमाण जास्त
पुणे हे सर्वांत जास्त काम करणाऱ्या शहरांपैकी एक आहे. 25-40 वयोगटांतील 74 टक्के कार्यरत लोकसंख्येला मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत. यातील 80 टक्के हे “आयटी’ क्षेत्रातील आहेत. 90 टक्के लोक त्यांच्या कामाच्या ओझ्याबद्दल चिंतेत आहेत. नोकरदारांमध्ये चिंता आणि पॅनिक ऍटॅक दिसून येतात.
महिला अधिक समस्याग्रस्त
पुरुषांपेक्षा नोकरदार महिलांना मानसिक आरोग्याच्या समस्या अधिक असतात. कामासोबतच मुलांची, घराची जबाबदारीही महिलांना पार पाडावी लागते. या सर्वेक्षणातून हे देखील निदर्शनास आले आहे, की मुले असलेल्या महिलांमध्ये मदत मागण्याची वृत्ती कमी आहे.
पन्नास टक्के ज्येष्ठ बेजार
पुण्यातील 60 आणि त्यापुढील वयोगटांतील वृद्ध लोकसंख्येपैकी 50 टक्के लोक मानसिक समस्येने ग्रस्त आहेत. या लोकसंख्येतील 25 टक्के लोक स्मृतिभ्रंश आणि नैराश्याने ग्रासले आहेत. पुण्यातील वृद्ध लोकांमध्येही “एम्टीनेस्ट सिंड्रोम’ आढळून येतो. इतर समस्यांमध्ये झोप आणि वर्तणूक विकार, संज्ञानात्मक घट किंवा गोंधळ यांचा समावेश आहे.
पुण्यात मानसिक आरोग्याच्या समस्येबद्दल जास्त बोलले जात नाही. पुरुषांपेक्षा स्त्रिया या समस्येकडे अधिक दुर्लक्ष करतात. कुटुंब आणि मुलांचे संगोपन यामुळे त्यांच्यावर आधीच ताण आहे. पुरुषांची आकडेवारीही फारशी वेगळी नाही कारण 49 टक्के पुरुष त्यांच्या सभोवतालच्या लोकांपेक्षा अधिक उदासीन वाटतात.
-बविथा थॉमस, मनोवैज्ञानिक
वाढत्या चिंतेमुळे आपल्या जीवनातील मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. “एम्पॉवर’चा मुख्य उद्देश देशातील लोकांना मानसिक आरोग्याविषयी योग्य माहिती देणे आणि मदतनीस म्हणून त्यांच्यासोबत राहणे हा आहे.
-डॉ. नीरजा बिर्ला,
संस्थापक, अध्यक्ष, “एम्पॉवर’