टाकळी ढोकेश्वर – पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे असलेल्या केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधितांचा आकडा वाढच आहे. आता 82 वर करोना बाधित झाले असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहेत. दरम्यान आता या सर्वांच्या ओमायक्रॉनच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
पारनेर तालुक्यातील करोना रुग्ण संख्या मागील दोन महिन्यांपासून आटोक्यात आली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला होता. यातच टाकळी ढोकेश्वर मधील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात चार दिवसांत 82 करोना बाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सर्व करोना बाधितांना पारनेरमधील ग्रामीण रूग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिली.
गुरुवारी (दि.23)विद्यालयातील 9 विद्यार्थ्यांना करोना सदृश्य आजाराची लक्षणे आढळल्याने त्यांची तपासणी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. या तपासणीत विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आले. या सर्वांच्या संपर्कात असलेले 10 जणांची तपासणी केली असता ते ही बाधित निघाले. ही संपर्क साखळी दिवसा गणित वाढत आहे. आतापर्यंत 82 जण बाधित आढळून आले असून यात विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
करोना बाधितांना पारनेर ग्रामीण रुग्णालयातील शासकीय कोविड सेंटरमध्ये आरोग्य विभागाने उपचारासाठी दाखल केले आहेत. विद्यालयात पारनेर, संगमनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर, नगर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इयत्ता दहावी व बारावीची अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी नवोदय विद्यालयामध्ये बाहेरून आले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून बाधा झाली असण्याची शक्यता आहे. नवोदय विद्यालयाच्या प्रशासन व पारनेर आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.