#प्रभात_दीपोत्सव_२०२० : कितीतरी दिवसात…

– सुचित्रा पवार


“अहो, ऐकलंत का? मी काय म्हणते, वर्क फ्रॉम होम चालूय, चार दोन दिवसांत सगळंच लॉकडाऊन होईल. मुंबईच्या 

गर्मीत कोंडून घेणे शक्‍य होणार नाही. आपण गावी जाऊया का? लॉकडाऊन संपेपर्यंत गावीच राहू, आपण आपले ऑफिस वर्क तिथूनच करू.’ 

“काय?’ मी ऐकून न ऐकल्यासारखे केले पण मनातून आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. जीवाच्या भीतीने का होईना ही गावाकडं यायला तयार झाली होती. नाहीतरी एरवी गावाकडचे नाव काढले तरी हिला राग यायचा. पोरांना तर गावाकडचं वारेच लागू दिलं नव्हतं हिनं! माझं मन गाव, घर, माणसांच्या ओढीने तळमळायचं, पण हिच्यात काही फरक पडायचा नाही. हिच्या सुट्ट्या जास्त तर पिकनिक, टूर आणि माहेरी संपत.

आता माहेरी जायचे तर पुण्यात पण करोना; मुंबईत तर दिवसेंदिवस पेशंट वाढत होते म्हणून तर हिच्या स्वार्थी विचाराने उचल खाल्ली होती. तसे गावी मी धावती भेट देत असे, पण मला तिथं मुक्काम करायला मिळायचा नाही. प्रत्येक वेळी आई विचारायची, “सविता न्हाई आली?’

मी उडवाउडवीची उत्तरे देई, पण आई समजून चुकली होती अन्‌ तिनं परत विचारायचं सोडून दिलं होतं. सवितापेक्षाही मला मुलांची जास्त काळजी होती. “मुलांना गावाचा, माणसांचा, भावंडांचा लळा लागेल की नाही?’

लग्नानंतर बऱ्याच वर्षांनंतर हिला घेऊन गेलो तर ही इथे-तिथे फुंकर मारून बसायची किंवा खुर्चीवर! कोणाशी बोलायची नाही, कुठल्या कामाला हात लावायची नाही की सर्वांच्या बाथरूममध्ये अंघोळ करायची नाही. हिच्यासाठी मग आई बाथरूम स्वच्छ धुवायची न मग ही अंघोळ करणार! 

खूप राग यायचा हिला असं वेगळेपण जपताना! पण काय करणार? चार दिवस एखाद्या वेगळ्या वातावरणात रमून, चार माणसात मिसळून, तिथल्या कामात मदत करणे हा एक वेगळा अनुभव, वेगळाच आनंद देतो ना? आपल्या घरात आपण असतोच की एकटे! पण हिला अनुभवाची काही पडली नव्हती, ना गावाची काही! हिचं वर्तुळ ठरलेलं ऑफिस-घर-फिरणे-मौजमजा-मैत्रिणी-अन्‌ माहेर बस्स! यापलीकडे तिला कधी जायचे नव्हते अन्‌ गेलीच तर क्षणीक केवळ औपचारिकता!

सगळं बदलता येतं पण स्वभाव अन्‌ संस्कार कधी बदलता येत नाहीत; म्हणून मी हिच्याकडूनच्या अपेक्षा सोडून दिल्या व समजून सांगणेही! गावाकडील माणसे तर इकडे कधीच फिरकत नसत, शेतीच्या कामातून त्यांना सवड नव्हती अन्‌ बंदिस्त वातावरणात त्यांना करमले पण नसते.

असो, हिच्या थोड्याशा खालच्या आवाजाने बरे वाटले. ती स्वतःहून यायला तयार होती पुढचे पुढे बघून घेता येईल म्हणून मी आवरायला सांगितले तरीही प्रेमळ ताकीद दिलीच, “बघ हं परत तिथल्या काही तक्रारी, कुरबुरी परत माझ्या कानावर येता कामा नये. अन्यथा मला इंटरेस्ट नाही. माझं काम तर इथूनही चालूच आहे. 

“नाही करणार!’ तिनं जमेल तितक्‍या पडेल आवाजात सांगितलं. इतके दिवस घरात बसून कंटाळलेली मुलंही हुर्या करून आपापली कपडे ब्यागेत भरू लागली. तेल, मीठ, किराणा-होतं नव्हतं तेवढं सगळं घेतलं. कारण मुंबईत परत येईपर्यंत ते किडून भुसा झाला असता.

गावी खूप दिवस रहायला मिळणार म्हणून माझं मन आनंदानं नाचू लागलं. नकळत मर्ढेकरांच्या कवितेच्या दोन ओळी ओठांवर आल्या…
कितीतरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो।
कितीतरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो।।
खरेच मुंबईत माझी न चांदण्यांची भेट होतच नव्हती. गावाकडे मला चांदण्यात बसायचे होते, बालमित्रांशी गप्पा मारायच्या होत्या. जुने दिवस आठवायचे होते. एरव्ही एकत्र असे सगळेजण भेटत नव्हतो; पण “वर्क फ्रॉम होम’ने सगळेच जण गावी होते. गावातले तर गावातच होते. गावाला नदी नव्हती; पण शेताशेजारच्या ओढ्याकाठी मला फिरायचं होतं…

भिरभिरता मोकळा वारा उनाड खोंडागत अंगावर झेलायचा होता… शेतातल्या तुडुंब विहिरीत मनसोक्त डुंबायचं होतं… आईच्या हातचे अस्सल गावरान पदार्थ खायचे होते… माडगं, जात्यावर भरडलेल्या मक्‍याच्या कण्या, सांडग्याचं कालवण, शेंगुळ, चुलीवरच्या भाकरी डांगर अन बरंच काही!
एसटया बंद होत्या पण खासगी वाहनांना परवानगी होती. मास्क, पुरेसे पाणी, खाऊ, जेवण, जादाची अंथरूण-पांघरूण

आणि… आमचा लवाजमा गावी निघाला…
संध्याकाळी अवचित आम्हाला अंगणात पाहून आई आबांना आनंद झाला. वहिनीने सर्वांवरून तुकडा ओवाळून टाकला. हात -पाय धुवून आम्ही सोप्यातच बसलो. मुलं प्रथमच बघत होती आजी-आजोबांना, चुलता-चुलती आणि चुलत भावंडांना!

“बरं झालं गावाकडे आलास’, आण्णा-मोठे बंधू म्हणाले. सविता नेहमीप्रमाणं खुर्चीवर बसली,मुलं कावरीबावरी होऊन सगळं न्याहाळत होती. तिही सविताला बिलगली होती. तिन्हीसांज झाली होती. आईने देवाला दिवा लावला. मीही आई-आबांना नमस्कार केला. देवाला नमस्कार करून तिथंच टेकलो. आबा “हरिविजय’ वाचत होते. वहिनीने धारा काढून आणल्या अन ताज्या गरम निरस्या दुधाचा चहा केला. “अहाहा!’ किती वर्षात असा अमृततुल्य चहा पिलो नव्हतो. माझ्या माणसांच्या अमृततुल्य गोडव्यासारखाच हा गोडवा शरीरभर पसरला.

अण्णा डेअरीला गेले. मीही आवरून अंगणात आलो. पाठोपाठ सविताही! कडुनिंबाच्या मोहोराचा सुगंध वाऱ्याच्या मंद मंद झुळुकीबरोबर पसरला होता. चाफा सुकलेल्या खोडावर भरगच्च फुलला होता. मोगऱ्याच्या सर्वांगावर हरितकांती पसरली होती; पहिलटकरणीसारखे तेज पानापानावरून ओसंडत होते, मन -चित्त कसे फुलून आले होते! प्रवासाचा शिण, कामाचा ताण, मुंबईतला तो दमट चिकचिकाट, कोलाहल काही काही जाणवत नव्हतं. खूप काही मनात साठवून ठेवलेल्या स्वप्नांना मी दररोज जागवणार होतो अन्‌ प्रत्यक्षात उतरवणार होतो. इथं ना मला मुलांकडे लक्ष द्यायला लागणार होते, ना काही खरेदीला सारखं बाहेर पडावं लागणार होतं!

मी दीर्घ श्‍वास घेतला. 

मुंबईची कोंडलेली हवा सोडून गावाकडची स्वच्छ मोकळी हवा श्‍वासात भरून घेतली. सविताला हळूच सांगितले, मी आता इथल्या मातीत मिसळलो. तू तुझे बघ. (खरे तर तिनं इथल्या मातीशी राहू दे निदान माणसांशी तर एकरूप व्हावे हीच मनापासून इच्छा होती) सविता निर्विकार हसली. मुलं घरभर हिंडत होती चुलत भावंडांच्या रूपात त्यांना सवंगडी मिळाले होते. जेवणे झाली. मी लिंबाच्या झाडाखाली टाकलेल्या खाटेवर आडवा झालो. सकाळी लवकर उठून मला माझी ऑफिसची कामं उरकायची होती.

पडल्या-पडल्या मला झोप लागली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला जाग आली. पहाटेचा सुखद गारवा सर्वांगाला लपेटला होता. आकाशात चंद्राची तेजस्वी कोर लक्ष वेधून घेत होती. चांदणे फिकट झाले होते. किती वर्षांनंतर निसर्गाच्या कुशीत मी विसावलो होतो. झोप शांत झाल्याने खूप हलकं हलकं उत्साही वाटत होतं.

आईने खांबाला रवी बांधून दही घुसळायला घेतले होते. आज नाश्‍त्याला मला ताक कण्या मिळणार होत्या तर! आबा अंघोळ उरकून देवपूजेच्या तयारीत होते. वहिनीने अंगणातली चूल पेटवून पाणी तापत ठेवले होते. अण्णा शेण घाण काढत होते.

“द्या अण्णा मी टाकतो पाटी…’ मी अण्णांच्या हातातील पाटी घेण्याचा प्रयत्न केला पण अण्णांनी नकार दिला. ज्याचं काम त्यानं करू जाणे. तू आवरून जा विहिरीवर मी आलोच!’ म्हणून अण्णांनी मला शेतावर जायला सांगितले. मी आंघोळीचे कपडे घेऊन गेलो. फार लांब नव्हते आमचे शेत. मी प्रथम खोपीजवळ गेलो. आईने खोपीपुढील अंगण सारवून लख्ख केले होते. खोपीमागील करंज कोवळ्या लुसलुशीत पोपटी पानांनी बहरला होता. मंद कडवट वास हवेत पसरून राहिला होता.

मी खोपीजवळ ध्यानस्थ बसलो. ध्यानधारणा झाल्यावर ओढ्याकाठी गेलो आकाशात नाना रंगांची उधळण झाली होती. तेज:पुंज केशरी गोळा क्षितिजावर हळूहळू वर सरकत होता. नेत्र सुखावणारे दृश्‍य होते ते! मी डोळ्यात सर्व साठवले. ओढ्याकाठी पळस लालभडक फुलला होता. पान कुठे नव्हतेच. लालकेशरी पाकळ्या मन मोहून घेत होत्या. आंब्याला मोहोर फुटला होता अन कोकीळ कुहूकुहूऽऽऽ करत होता.
लहानपणी आई म्हणायची, “कोकीळ सांगतोय शेतीची मशागत करा.’ मला गम्मत वाटायची.

नारळ, रामफळ, सीताफळ, चिकू, लिंबू… आबांच्या मागे अण्णांनी मळा खरेच तस्सच्या तस्सा फुलता ठेवला होता. मी कडुनिंबाची काटकी दाताखाली चावली. लहानपणचे आमचे दंतमंजन! मी माझी दिवसभर कामाला बसायची जागा हेरून ठेवली -खोपीजवळ करंजाच्या सावलीत! अन्‌ विहिरीवर येऊन झोकून दिले पाण्यात खोल. पाण्याचा तो उबदार स्पर्श कितीतरी वर्षांनी अनुभवत होतो! सूर्याची किरणे झाडीतून खाली उतरत होती. कितीतरी वर्षाने जणू स्वर्गसुखाचा आनंद मी घेत होतो!

मी घरी येईपर्यंत मी आल्याची वर्दी गावभर पोहोचली होती. झाडून सारे लिंबाखाली येऊन ठरावीक अंतरावर बसले होते. अण्णांनी लिंबाच्या एका फांदीला झोका बांधला होता; मुलांची मजाच! बाईसाहेब आवरून पाठीमागच्या खोलीत खुर्चीवर बसून मांडीवर लॅपटॉप ठेऊन कामाच्या तयारीत होत्या. चहाचा कप तिथेच बाजूला होता.

एकंदरीत घरचे सगळे तिला नाश्‍ता, चहापाणी जागेवर पोहच करणार होते तर! नोकरी करणारी सून म्हणून सगळ्यांनाच तिचं अप्रूप अन्‌ कौतुक पण! वहिनी स्वयंपाक, आले-गेलेल्यांचं करण्यात मग्न, आबा देवपूजा आटोपून डेअरीत गेलेले. मी बाहेर येऊन दोस्तांशी गप्पा मारल्या. बरेच बेत आखले. सगळ्यांच्या ख्याली-खुशालीच्या चर्चा झाल्या अन दर रविवारी सर्वांची पुरेशी काळजी घेत एक एक कार्यक्रम ठरला. मीही आवरून माझा बाडबिस्तरा घेऊन शेतावर गेलो. मागून आई जेवण घेऊन येणार होती.

खोपीजवळच्या करंजाखाली गार दाट सावली पडली होती. अण्णांनी सावलीत माच ठेऊन त्यावर वाकळ घालून सतरंजी टाकून ठेवली होती. माझं गाण्याचं वेड लक्षात ठेवून झाडाच्या खोडावर ट्रान्झिस्टर अडकवला होता. सावलीत एक माठ त्यावर पाणी पिण्यासाठी छोटंसं लोटकं ठेवलेलं. “खरेच किती किती जीव लावतात अन्‌ आपली काळजी घेतात आपली माणसं!’ विचार येऊन मन भरून आलं.

वारा छान सुटला होता. निसर्गाच्या साक्षीने माझं काम सुरू झालं. प्रसन्न मोकळ्या हवेत आणि विशेष म्हणजे ताणविरहित, चिंतामुक्त मोकळ्या वेळेत माझा कामाचा उरक झपाट्याने झाला. आनंद उत्साह भरभरून मिळाला. लग्नानंतर प्रथमच मला हा न भूतो न भविष्यती आनंद मिळाला होता “थॅंक्‍यू करोना; तू भयानक असलास तरी आमचा दिशाहीन वेग कमी करून पूर्वपदावर काही काळ का होईना आणलेस….’
गावी येऊन आता 15 दिवस झाले होते.

आमच्या अंदाजाप्रमाणे प्रथम महाराष्ट्र अन्‌ परत भारत लॉकडाऊन झालं होतं.
मुलं गावी चांगलीच रुळली होती. सुनेची अडचण ओळखून आबांनी सविताला एका दिवसात सुताराकडून टेबल करून घेतले होते. सविताही परिस्थितीला बऱ्यापैकी जुळवून घेत होती. दररोज नाही; पण रविवारी बऱ्यापैकी किचनचा ताबा घेत होती. मुलांना संध्याकाळी गमती जमती, गोष्टी सांगत होती. मुलांसाठी खाऊ करून देत होती. आईने वहिनीच्या मदतीने माझे सर्व खाण्याचे लाड पुरवत आणलेले; आता त्या उन्हाळी कामात व्यस्त होत्या. एकंदरीत एकत्र कुटुंबातील मजा, संस्कार मुलांवर आपोआप होत होते
आण्णा मुलांना कैऱ्या, चिंचा पाडायला मदत करत होते. मुलं पुस्तकातले अनुभव प्रत्यक्ष घेत होती. कधी बैलगाडीत बसवून शेतात न्यायचे, पोहायला शिकवायचे.

मुलांना हळूहळू सगळ्यांचा लळा लागत होता. पशू-पक्षी, झाडे, फुले-फळे मुलं प्रत्यक्षात पहिल्यांदाच झाडावर पाहात होती. सवितानेही एका रविवारी माझ्यासोबत शेतात फेरफटका मारला. स्वतःचे हिरवेगार शेत बघून तीही हरखून गेली. तिच्या डोळ्यातला आनंद बरेच काही बोलून गेला. तिच्या मागे मुलांची काही भुणभुण नव्हती. अण्णा, आबा, आई या तिघांच्यातच मुले घुटमळत.

सगळे मिळून अंगणातल्या झाडाखाली चांदण्याच्या जाळीत गप्पा मारत असू. म्हातारे कोतारे, काक्‍या, चुलत आज्या तोंडाला पदर बांधून लांब लांब बसून गप्पात सामील होत. सगळ्यांच्याच चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वहात होता.

दूरवर गेलेली रानची पाखरे घरट्यात परतली होती. एकत्र आली होती. नुसती एकत्रच आली नव्हती; तर मनाने पण जवळ आली होती. मनातले भेदाभेद, अहंकार, श्रेष्ठत्व सगळं काही गळून पडलं होतं. नात्यांचे उसवलेले बंध पुन्हा गच्च विणले गेले होते. नात्यांच्या सहवासाने नात्यांची ओढ अजूनच वाढली होती. इकडचे कालवण तिकडं, इकडचे डांगर, तिकडचे भरीत पुन्हा नव्याने एक झाले होते.

“दर सुट्टीला गावी येऊ…’ सविताने मला सांगून टाकले होते. सतत आतून टोचणारी माझी सल ईश्‍वरानेच जणू कुठल्या न कुठल्या कारणाने काढून टाकली होती. मी मनोमन त्याचे आभार मानले. करोनाचा धोका टळल्यानंतर सर्व मित्र एकत्र येणार होतो. सगळ्यांच्या बायकांशी ओळख करून देणार होतो. पुढील उन्हाळ्याच्या सुट्टीपासून सर्वच जण कोणत्याही परस्थितीत आठ दिवस का होईना सहकुटुंब गावी येऊन एकत्र रहाणार होतो.

मित्रपरिवार पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देणार होता. लॉकडाऊन संपले की आम्ही दोघे मुंबईला परतणार होतो. मुलं सुट्टी संपेपर्यंत इथंच रहाणार होती. जूनमध्ये अण्णा मुलांना सोडायला प्रथमच मुंबईला येणार होते अन्‌ दिवाळीत आई, आबा आण्णा वहिनी सर्वच मुंबईला येणार होते. सविताने तसे आग्रहाने सांगितले होते. मी कधी कल्पनाच केली नव्हती, इतके सारे सूर एकत्र येऊन सगळं सुरेल होईल!

माझा मनमोर आनंदानं थुईथुई नाचत होता; वसंतातल्या सळसळणाऱ्या कोवळ्या

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.