#प्रभात_दीपोत्सव_२०२० : आभाळ

– अपर्णा कुलकर्णी


पडल्या पडल्या खिडकीचा पडदा बाजूला सारला. नाही म्हणलं तरी कंबरेतून एक बारीक कळ गेली. आई गं…मी कळवळले. खिडकीतून बाहेर पाहिलं तर आभाळ भरून आलेलं दिसलं. या आभाळाचं आणि माझं खूप जुनं नातं आहे. सगळे असूनही कधी एकटेपणा भरून राहात असे तेंव्हा हे आभाळच तर मला साथ देत असे. त्या आभाळातले वेगवेगळे रंग, आकार पाहाताना मी हरखून जात असे. हरवून जात असे. वेगवेगळ्या गोष्टी तयार करून मी त्यातच रमून जात असे! आपलं एकटेपण विसरुन जात असे. 

आताही तसंच झालं. मी स्वत:ला असलेला आजार, आमचं परदेशी जाणं, आयुष्यासोबत असलेला लढा, जगण्यासाठी जमवलेली उमेद, बाबांनी दिलेला त्रास, आईचं अचानक जाणं…सगळं सगळं विसरले.
आभाळात बघताना मला वेगवेगळे आकार दिसायला लागले. गावाकडचा वाडा, परसातली विहीर, फुललेला मोगरा, आईचा चेहेरा, माईंचा चेहेरा, विनूकाकाचा चेहेरा, दादांचा चेहेरा अगदी कपाळावरच्या
नामासकट, एक ढग वेगाने आला आणि त्याने बाबांच्या चेहऱ्याचा आकार घेतला. सगळे ढग उलटे-पालटे होत गडगडल्यासारखे वाटायला लागले. पाठीत अजूनच कळ गेली. पडदा ओढून घेतला आणि खाली सरकून उशीवर डोकं ठेवून डोळे मिटून शांत पडून राहावंसं वाटू लागलं.

आज असे गेलेल्या लोकांचे चेहेरे आपल्याला का दिसले? असं म्हणतात की जाणाऱ्या माणसाला आधी मृत झालेल्या जवळच्या माणसांचे चेहेरे दिसतात. बापरे. दचकलेच नाही म्हंटल तरी…. म्हणजे. म्हणजे अखेर ती वेळ आली. कितीवेळा त्या मृत्यूला हुलकावणी देउन आले होते.

आज माझा 65 वा वाढदिवस आहे. सगळे येतील आज. सत्येन्द्र तयारीसाठी म्हणून बाहेर गेले होते. खरंच उद्या मला मरण आले तर… त्या विचारानेही समाधान वाटलं. आज मी पूर्ण समाधानी आहे आणि मृत्यूच भय अजीबातच नाहीये, पण या मृत्यूची चाहूल पंचवीस वर्षांपूर्वी लागली तेंव्हा पायाखालची जमीन सरकली होती.

खरं तर अवघ्या चाळिशीत असताना ह्या राक्षसासारख्या अक्राळविक्राळ रोगाने पहिलं पाऊल टाकलं. कोलमडून गेले होते मी. दृष्ट लागावी असा देखणा संसार, सत्येन्द्रसारखा हळुवार प्रेम करणारा नवरा, अक्षयसारखं गुणी बाळ, आईच्या मायेनं समजून घेणाऱ्या सासूबाई आणि कडक शिस्तीचे पण हुशारीचे कौतुक असणारे दादा! काही म्हणजे काही कमी नव्हतं. वडिलोपार्जित ही भरपूर होतं आणि सत्येन्द्रना गावातच चांगली नोकरी होती. लहानपणी इतके कष्ट केले पण आता स्वतःचीच नजर लागेल की काय असं भरभरून सुख माझ्या पदरात पडलं होतं. डोळ्यासमोर पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ जसाच्या तसा उभा राहिला.

आठव्या वर्षी अक्षयची मुंज करायची ठरवलं. किती व्यवस्थित नियोजन करून मुंजीचा सोहळा अगदी छान पार पडला. किती कष्ट केले त्याचं सार्थक माझ्या चेहऱ्यावर दिसत असावं. सासूबाईनी अगदी जवळ बोलावून मायेने दोन हात चेहऱ्याभोवती फिरवून कडकडून बोटं मोडली.

माझी लगबग सत्येन्द्र अनिमिषपणे पाहात होते. किती सुंदर दिसतीये ही. ज्या अगत्याने मी आलेल्या पाहुण्यांशी बोलत होते, ते पाहून सत्येन्द्रचा उर अभिमानाने भरून आला होता. बायको, सखी, मैत्रीण, बहीण अगदी कधी आईही झाले होते मी त्यांची. किती नशीबवान मी… असं वाटून गेलं होतं त्यांना. दिवसभराचा थकवा मला जाणवत होता.

‘कॉफी?’ 

सत्येन्द्र दोन कॉफीचे मग घेऊन समोर उभे होते. मी वळून पाहिलं. हसतच कॉफीचा मग घेतला. माझ्या डोक्‍यावरून अतीव मायेनं हात फिरवत त्यांनी विचारलं,
‘दमलीस ना? किती धावपळ करशील… बघ किती थकलीयेस.’
त्यांनी सहज माझा हात हातात घेतला आणि ते दचकलेच. बर्फासारखा थंडगार हात होता.
‘अगं काय होतंय तुला…’
काही बोलेपर्यंत तर मला जोरदार चक्कर आली होती. गरम कॉफी अंगावर सांडली. माझ्याकडे बघून सत्येन्द्र घाबरून गेले होते. डॉक्‍टर आले. त्यांनी तपासलं आणि सांगितलं की अतिश्रमामुळे थकवा आहे. आणि दोन चार दिवसांत बरं वाटेल.

चार दिवस झाले तरी म्हणावी तशी ताकद अंगात नव्हती. मुंजीला यायला जमलं नाही म्हणून विनूकाका भेटायला आले. विनायककाका म्हणजे माझा काका… बाबांपेक्षाही माझ्यावर जास्त जीव होता त्यांचा. डॉक्‍टर असणाऱ्या विनूकाकांनी लग्न केलं नव्हतं आणि समाजसेवेचं व्रत घेतलं होतं. त्यांची नाडीपरीक्षा अतिशय उत्तम होती. त्यांनी नाडी हातात घेतली आणि त्यांचा चेहेरा एकदम गंभीर झाला. त्यांनी सत्येन्द्रला बोलावून काही औषध लिहून दिली. माझ्या डोक्‍यावर हात फिरवत ते शांतपणे बसून राहिले. 

‘काका… काय झालं आहे मला…’
‘काही नाही गं… खूप थकवा आलाय तुला.’
‘नक्की ना… तुम्ही काही लपवत नाही ना’
‘नाही गं.’

त्या ‘नाही गं’मधे काहीच जोर नव्हता, हे माझ्या लक्षात आलं. अजून काही विचारण्याचं धाडस झालं नाही. सत्येन्द्र धावतच औषध घेऊन आले. विनूकाकांनी एक गोळी काढून दिली.
‘जानू… काही होणार नाहीये तुला…’ सत्येन्द्र कासावीस होत म्हणाले. मी कसंनुसं हसले.
विनूकाका बाहेर निघून आले होते. माझा डोळा लागलेलं पाहून सत्येन्द्र त्यांच्याजवळ आले.
‘काय झालं आहे काका, जानूला’ विनूकाकांनी जो अंदाज वर्तवला तो ऐकून सत्येन्द्र मटकन खालीच बसले. 

सत्येन्द्रना विनूकाकांनी खांद्याला धरून उठवलं. शांतपणे त्यांचा खांदा थोपटत ते उभे राहिले. अक्षय बाहेरून खेळत खेळत आला. त्याच्याकडे बघून सत्येन्द्रनी मान वळवली… आपले भरले डोळे दिसायला नकोत म्हणून. तरीही अक्षयला काहीतरी बिनसलं आहे हे जाणवलं. तो एकदा आपल्या बाबाकडे आणि एकदा आब्बांकडे बघत होता. विनूकाकांच्या ते लक्षात येताच ते म्हणाले, ‘काय… झालं का खेळून? बरं बाबांसाठी जरा पाणी आण बरं…’
‘बाबा रडतोय का?’
‘छे रे… अरे बाबाच्या डोळ्यात माती गेलीये… जा तू पाणी आण… जा जा पळ… आण लवकर…’
अक्षय पळत गेला तसं सत्येन्द्रकडे पाहात त्यांनी खूणेनेच ‘नको’ असं सांगितलं आणि त्याच्या खांद्यावर थोपटत राहिले. दोघंही शांत उभी होती पण काही वेळा शांतताच खूप काही बोलून जाते.
मला जाग आली… संध्याकाळचे सहा वाजून गेलेत आणि तिन्हीसांजेला आपण असं झोपलोय काय? आईंनी… सत्येन्द्रनी… अक्षयने कोणीच कसं उठवलं नाही आपल्याला? साडेचारची दादांची चहाची वेळ कशी चुकली. बाप रे अंधारून आलंय चांगलंच. विनूकाका कुठंय? आपल्याला गोळी दिली आणि जी झोप लागली ती आताच जाग येतेय. मी उठणार तेवढ्यात सत्येन्द्रनी हात धरला.
‘झोप तू… उठू नकोस.’

‘अहो…काही काय? अक्षय कुठं आहे? विनूकाका, दादा, आई कुठंयत? आणि किती वेळ झोपले मी? तुम्ही उठवलं का नाही. दादांना चहा दिला का?’ 

‘शू।।… किती प्रश्‍न विचारशील… झोपलेत सगळे.’
‘काय… किती वाजले?’
मी घड्याळ पाहिलं आणि दचकलेच. बाप रे पहाटेचे चार वाजले होते. म्हणजे काल दुपारपासून मी झोपले आहे.

‘काय हे… तुम्ही उठवायचं नाही का मला. आई-दादांना काय वाटेल?’
‘कोणाला काही वाटत नाही जानू… किती विचार करशील सगळ्यांचा आणि हो लगेच साडेपाचला उठून मागे गोठ्यात जाण्याची काही गरज नाही. महादू येईल तेंव्हा बघेल तो.’
‘अहो हे काय नवीनच… शंकरीचे दिवस भरत आलेत… सकाळी तिच्याशी मी बोलले नाही, चारा घातला नाही तर रागावून बसते ती माहितीये ना तुम्हांला…’
‘आणि जर लवकर उठलीस तर मी रागावेन!’

फुरंगटुन त्यांनी पाठ फिरवली. मला मनापासून हसू आलं. त्यांना आपल्याकडे वळवत त्यांचा चेहेरा आपल्या ओंजळीत घेत त्यांच्या डोळ्यात पाहात विचारलं…
‘विनूकाकांनी काय सांगितलं सांगाल मला…’

माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच सत्येन्द्रनी घट्ट मिठी मारली आणि ते गदगदून रडायला लागले. मी ही शांतपणे त्यांच्या पाठीवरून हात फिरवू लागले. त्यांचा कढ ओसरू दिला. त्यांच्या केसांतून हात फिरवत मी तशीच पडून राहिले. मग हळूच विचारलं… ‘गाणं म्हणू… तुम्हांला आवडतं ते…’
त्यांच्या होकाराची वाट न पहाता मी सावकाश गुणगुणू लागले.
‘हमको मीली है आज ये
घडियां नसीब से
जी भर के देख लीजिए
हमको करीबसे
हम आपके नसीब मे ये बात हो ना हो…
सत्येन्द्रनी तिच्या ओठांवर हात ठेवला. जगभराची वेदना त्यांच्या डोळ्यात उमटली होती. आवेगाने त्यांनी मला जवळ घेतलं.

‘सत्येन्द्र… काहीतरी गंभीर आहे हे माझ्या लक्षात येतंय; पण काय ते तुम्ही सांगाल का? असं हळवं होवून कसं चालेल? अक्षय… दादा… आई त्यांच्याकडे कोण बघणार.’
‘तुला काहीही झालं नाही… मी तुला काहीही होऊ देणार नाही.’

‘हो ना… झालं तर मग… आता सांगा बरं मला विनूकाकांनी काय सांगितलं?’
सत्येन्द्र उठून बसले. मान खाली घालून ते बसून राहिले. मी हलकेच त्यांची हनुवटी वर केली. बराच वेळ ते माझ्याकडे बघत राहिले आणि त्यांना अनावर हुंदका आला.

‘ ह्म्‌म… बास… बास…’
‘जानू… उद्या तुझी ब्लड टेस्ट करायची आहे.’
‘हात्तीच्या… एवढंच ना… अहो हल्ली थोडं काही झालं की सगळ्या टेस्ट्‌स करायला सांगतात त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे.’

‘जानू… तुझे जुने रिपोर्ट्‌स विनूकाकांनी पाहिलेत. पांढऱ्या पेशींची संख्या ऍबनॉर्मली वाढली आहे वाढतेय आणि तुझी एकंदर तब्येत आणि नाडीपरीक्षेवरून त्यांना वेगळीच शंका येतेय…’
‘वेगळीच म्हणजे…’

बराच वेळ दोघं शांत बसून राहिलो. तेवढ्यात मोठ्या दरवाजावर जोरजोरात धडका मारण्याचा आवाज यायला लागला. एवढ्या पहाटे कोण आलं. दोघंही दचकून एकमेकांकडे बघायला लागलो. तेवढ्यात दिवे लागले. दोघही उठून बाहेर आलो. दादांचा करारी आवाज त्या शांत वातावरणात घुमला…
‘कोण आहे रे… दम धरवत नाही का जरा…’

असं म्हणतच त्यांनी दार उघडलं. दारात डोकावून पाहिलं आणि माझा चेहेरा पांढराफट्टक पडला.
मी उभ्या उभ्या थरथरायला लागले. सत्येन्द्र घाबरले आणि कोण आलं आहे, ते न बघता ते मला खोलीमधे घेऊन गेले.

दादांनी दारात उभे असलेल्या माणसाला वरपासून खालपर्यंत न्याहाळले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्‍चर्य, दु:ख, राग अशा कितीतरी भावना दिसत होत्या. दारात एक अतिशय फाटक्‍या शरीरयष्टीचा माणूस उभा होता. त्याने भगवी कफनी घातलेली होती आणि दाढी वाढलेली… जटा वाढलेल्या अशा अवस्थेत तो अतिशय पडेल चेहऱ्याने उभा होता. दादा हात पाठीशी लावून त्यांच्याकडे बघत म्हणाले…’असे धूमकेतू सारखे कसे उगवलात?’

‘मी आत येऊ का?’
त्यांच्या स्वरात अजीजी होती. त्यांच्याकडे न बघता दादा वळून चालायला लागले आणि तीच पडत्या फळाची आज्ञा समजून तो माणूसही आत आला.
‘पाणी मिळेल का जरा…’
‘फक्त पाणीच मिळेल… जास्त अपेक्षा ठेवू नका आणि निघताय कधी ते सांगा.’
तेवढ्यात पाण्याचा तांब्या भांडे घेऊन माई आल्या. दादांकडे बघून त्यांनी जरासं डोळे मोठे करत म्हणाल्या
‘हे काय लक्षण तुमचं… घरात आलेल्या पाहुण्याशी असं बोलतं का कुणी?’
मग मधेच त्या माणसाकडे पाहात म्हणाल्या ‘हे काय करून घेतलंय तुम्ही स्वत:चं… आयुष्य संपत आल्यावर तरी सुधारावं माणसानं… असो… मी कोण म्हणा सांगणारी तुम्हांला… हे घ्या पाणी. चहा टाकते की पडताय थोडं?’

नकारार्थी मान हलवत तो मान खाली घालून बसून राहिला. दिवस सुरू झाला… जणू तो तिथे नाहीच असे दादा वागत होते. माईही कामाला लागल्या. खोलीत मी तळमळत होते. सत्येन्द्रनी तिला चहा आणून दिला. पाठोपाठ माईही खोलीत आल्या. मी उठायचा प्रयत्न करायला लागली तसं म्हणाल्या…’अगं पड… पड… कसं वाटतंय आता. काल खूपच गळून गेली होतीस. विनूकाकाच्या हाताला गूण आहे हां पण… बघ किती छान झोप लागली होती तुला. काय होतंय जानकी तुला? अशी का दिसतेस घाबरल्यासारखी… काही होणार नाही तुला… गुणाची माझी बाय ती…’
त्यांनी तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला.

सत्येन्द्रनी विचारलं…’आई कोण आलं गं?’
माईंनी एक मोठा सुस्कारा सोडला आणि म्हणाल्या, ‘जानकीचे बाबा आलेत.’
‘काय…’सत्येन्द्र जवळपास ओरडलेच.
‘हे बघ सत्या… ही वेळ चिडण्या रागावण्याची नाहीये… त्यांची तब्येत ठीक दिसत नाहीये आणि अशावेळी दारात आलेल्या माणसाशी नीट वागावं’
‘काय बोलतेस तू आई…

स्वत:ची बायको गेली तरी हा माणूस आला नाही. स्वत:च्या नातवाच्या मुंजीला हा माणूस आला नाही आणि काय तोंड घेऊन आलाय हा इथे? लेक म्हणून त्यांच्या पोटी जन्माला आली हा जानूचा गुन्हा आहे का? आयुष्यभर फक्त आणि फक्त त्रास दिला या माणसाने. आता कशासाठी सुखात विष कालवायला आलाय हा माणूस!’

बोलताना त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं तसं ते सावरून घेत म्हणाले
‘बरं ते जाऊदे… आई आज मी ऑफिसला जात नाहीये आई… डब्याची घाई करू नकोस. अक्षयला आज महादू सोडवेल शाळेत.’

‘का रे… तू का नाही जाणार आज ऑफिसला?’
‘आज जानकीच्या काही महत्त्वाच्या टेस्ट्‌स करायच्या आहेत आई… काल विनूकाकांनी सांगितलं आहे.’
अचानक मी उठून उभी राहात सत्येन्द्रना विचारलं, ‘विनूकाका… विनूकाका कुठे आहेत? बाबांची आणि त्यांची भेट झाली तर काय होईल ते देवच जाणे. मी बघते बाहेर…’

‘अगं हो हो… विनूकाका कालच रात्री गेले… मीच बसवून दिलं त्यांना… त्यांच्या पाड्यावर कुणी बाई अडली म्हणून निरोप आला आणि त्यांना निघावं लागलं. तुला खूप गाढ झोप लागली होती म्हणून उठवू नको म्हणाले.’

‘सत्या… काळजीचं काही नाही ना रे?’ माईंनी काकुळतीला येऊन विचारलं.
‘आई स्वामींवर विश्‍वास आहे ना तुझा… काळजी करू नकोस,’ पण हे बोलताना सत्येन्द्रचा आवाज नकळत भरुन आला. पण ते लक्षात आलं नाही असं भासवत माई तिथून निघून गेल्या.

अक्षयला उठवून त्याचं सगळं आवरून, त्याला डबा करुन दिला. महादू रोजची कामं आवरून त्याला शाळेत सोडायला गेला. दादा फिरायला जाऊन आले. सगळ्यांचा नाष्टा झाला. स्वत:चं सगळं आवरलं पण अजून मी खोलीच्या बाहेर गेलेच नव्हते. माझी हिम्मतच होत नव्हती त्यांच्यासमोर जाण्याची.

का… का आलेत पुन्हा हे. मी मुलगी म्हणून माझ्या कर्तव्यात कुठेही कमी केली नाही. पण आई गेली तेंव्हा ते आले नाहीत तेंव्हाच माझ्यातलं आणि त्याच्यातलं नातं संपलं होतं. आपण कोणाच्या पोटी जन्माला यावं ते आपल्या हातात नसतं… ना आपल्याला आपले आई-वडील, नातेवाईक निवडण्याचा अधिकार असतो.

तसा तो असता तर मी कधीच या माणसाची वडील म्हणून निवड केली नसती. आज माझ्या टेस्टमध्ये सगळं नीट असेल ना याही पेक्षा जास्त ते इथे आले आहेत या गोष्टीचं टेंशन जास्त आलं आहे. त्यांच्यासमोर जाणंच नको… दोन दिवस रहातील आणि जातील निघून!

असेच कितीतरी विचार माझ्या डोक्‍यात गांधीलमाशांसारखे घोंघावत होते. त्या विचारांनी ही मला कलकलायला लागलं.
‘येऊ का गं आत…’
तोच आवाज… माझ्या कानात लाव्हारस ओतल्यासारखे झाले. मी रागात दाराकडे पाहिलं तर ते… माझे बाबा दारात हसत उभे होते. हा माणूस हसू कसं शकतो… माझ्या मस्तकात कळ गेली. मी आत बोलावण्याची वाट ही न बघता ते आत माझ्या समोर येऊन बसले…
‘काय झालं तब्येतीला?’

‘काही नाही… तुम्ही नका लक्ष घालू… तुमचं काय काम आहे ते सांगा.’
‘का? कामाशिवाय येऊ शकत नाही का? बाप आहे मी तुझा’
‘हो?’

माझा स्वर कडवट झाला होता. चेहऱ्यावर वेदना उमटली… संतापाने डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं! तेवढ्यात सत्येन्द्र तिथे आले. त्यांना एकंदर परिस्थितीचा अंदाज आला. त्यांनी मला थोपटल्यासारखं केलं आणि म्हणाले, ‘जानू… तू फ्रेश हो, आपल्याला लॅबमध्ये जायचंय’
मी उठून मुकाटपणे बाथरूममध्ये निघून गेले.

सत्येन्द्रनी एक जळजळीत कटाक्ष त्यांच्याकडे टाकला आणि म्हणाले, ‘तुम्हांला दादा बोलावतायत बाहेर. ‘
त्यांच्या प्रतिक्रियेची वाट न पाहता बाहेर निघून गेले. ते चडफडत बाहेर आले. बैठकीत दादा लोडाला टेकून सुपारी कातरत बसले होते. माई अक्षयला शाळेत जाण्यासाठी तयार करत होत्या. महादू आला होता आणि तो गोठ्यात काम करत होता.

आपल्याकडे कोणीच लक्ष देत नाही हे त्यांच्या लक्षात येत होतं तरी तसंच निलटा सारखं हसत ते दादांजवळ जाऊन बसले आणि उगाच काहीतरी विषय काढायचा म्हणून म्हणाले,
‘हल्ली उष्मा’फार वाढलाय नाही?’

दादांनी त्यांच्याकडे पाहिलं. नाही म्हंटलं तरी मनातून थोडी भीतीच वाटली पण तसं न दाखवता ते म्हणाले, ‘नाही म्हणजे खरं तर पाऊस पडायला हवा… जुलै उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही. निसर्गही लहरीच झालाय!’

आता मात्र दादांचा संयम संपला अन ते म्हणाले, ‘तुम्ही हवामानाच्या गप्पा मारण्यासाठी नक्कीच आला नाहीत इथे! तुमचं नेमकं काय काम आहे ते कळलं तर बरं होईल. ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काय अर्थ आहे? किती पैसे हवेत ते सांगा’

खजील होत ते म्हणाले, ‘नाही… नाही पैसे नकोयत मला… जानूला बघावंस वाटलं म्हणून आलो. संन्यास घेतल्यामुळे आता माझ्या गरजाही फार नाहीत… मला कशाला पैसे हवेत? शप्पत सांगतो फक्त तुम्हां सगळ्यांनाच भेटायला आलो’
तेवढ्यात सत्येन्द्र आणि मी बाहेर आलो.
‘आम्ही जाऊन येतो जरा…’

म्हणून ते दोघे निघून गेले. माई, दादा आणि ते असं तिघेच उरले. वातावरणात एक अवघडलेपण भरून राहिलं होतं. माईच ती शांतता भंग करत म्हणाल्या, ‘हे पाहा… आतापर्यंत तुम्ही काय वागलात, तुमच्यामुळे काय त्रास झाला याचा पाढा मला नाही वाचायचा! पण एक विनंती मात्र करते, जानूची तब्येत बरी नाहीये आणि तिला त्रास होईल असं आता काही वागू नका’

‘छे हो… मी का त्रास देईन? माझी मुलगीच ना ती. मी पण माणूस आहे हो आणि एक बापही’
असं म्हणून त्यांनी डोळ्याला खांद्यावरचा पंचा लावला. त्यांच्यावर एक करडी नजर टाकत दादा म्हणाले, ‘हे पहा गेली 15 वर्ष तुम्हांला ओळ्खतोय मी… उगाच नाटकीपणा नको. जे काय काम आहे ते स्पष्टच सांगा, उगाच तुमचा आणि आमचाही वेळ वाया घालवू नका’

आता मात्र त्यांच्या चेहेऱ्यावरचे अजीजीचे, केविलवाणे भाव एकदम बदलले आणि त्यांचा चेहेरा ताठर झाला आणि दादांकडे पहात ते म्हणाले ‘ठीक आहे… मुद्द्याचं बोलतो! जानू आणि प्रसादच्या नावावर एक जमिनीचा तुकडा आहे त्यावरचा हक्क तिने सोडायचा… तिची सही हवी आहे, मला ती जमीन विकायची आहे.’

माई आणि दादा आश्‍चर्याने त्यांच्याकडे बघायला लागले. राग, दुःख, वेदना, संताप अशा मिश्र भावना त्यांच्या चेहेऱ्यावर दिसायला लागल्या!

खिशातून एक चुरगळलेला कागद काढून त्यांच्या पुढे नाचवत ते म्हणाले, ‘तिची सही घेऊन ठेवा… पुन्हा पाऊल ठेवणार नाही तुमच्या घरात.’
‘सुंभ जळाला तरी पीळ काही सुटत नाही’असं म्हणत माई तिथून उठून गेल्या.

दोन तीन दिवस थांबा… जानूचे रिपोर्टस्‌ येऊ देत मग बघू,’ असं दादांनी सांगितलं आणि “या दिवसात कमीत कमी जानूच्या संपर्कात राहा,’ असं बजावून सांगितलं! त्यांनीही मान हलवून मान्यता दिली. ते दिवस असेच गेले…

माईंनी देवापुढे दिवा लावला. अंगारा जानूच्या कपाळावर लावला. सत्येन्द्र रिपोर्ट घेऊन आले. सगळे त्यांच्या भोवती जमा झाले.

खरं तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस! पण आज सकाळपासून हे रिपोर्ट्‌सचं भूत सगळ्यांच्याच डोक्‍यावर बसलं होतं. मी आशेने सत्येन्द्रांकडे पाहिले. ते हसतच म्हणाले, ‘रिपोर्टस्‌ एकदम नॉर्मल आले आहेत… आहात कुठे?? जानू जानू…. आज मी खूप खूष आहे. चल… चल आपल्याला मंदिरात जाऊन यायचं आहे’

माई, दादा, महादू सगळेच आनंदात होते. ‘परमेश्‍वरा तूच रे… तूच आहेस पाठीशी,’ असं म्हणून हात जोडले आणि साखर ठेवायला म्हणून आत उठून गेल्या. महादुही परसाकडे पळाला. अक्षयला घेऊन दादा फेरी मारायला म्हणून निघून गेले. मी सत्येन्द्र कडे टक लावून पहात होते, पण का कोणास ठाऊक ते माझी नजर टाळतायत असं मला वाटलं. त्यांचा उत्साह मला खोटा खोटा वाटत होता. माझ्याकडे बघण्याचं टाळत म्हणाले, ‘अगं उठ ना… जाऊन येऊ आपण.’

‘तुम्ही काही विसरला नाहीत ना?’
त्यांनी दचकून पाहात विचारलं, ‘काय?’
‘काही नाही… असंच विचारलं,’असं म्हणत मी आवरायला निघून गेले.

बाहेर पडलो तसा सत्येन्द्रमधला बदल मला जाणवत होता. ते खूप जास्त बोलत होते, गाणं गुणगुणत होते. गाडी मंदिराकडे न वळता तलावाकडे वळली. याच तलावाच्या काठी आमची पहिली भेट झाली होती. सत्येन्द्रनी खूप समंजसपणे माझं बोलणं ऐकून घेतलं होतं. बाबा आणि आईमध्ये नसणाऱ्या नात्याबद्दल! प्रसादची माझ्यावर असणारी जबाबदारी, आईला असलेला हृदयरोग, माझं करपून गेलेलं बालपण, जबाबदाऱ्यांमुळे क्षमता असूनही अर्धवट असणारं माझं शिक्षण, बाप असणाऱ्या माणसाचा बदफैलीपणा, जुगारी असल्याचा त्रास!

कितीतरी सांगूनही त्यांनी मला होकार दिला. आणि आजच्याच दिवशी 11 वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं. आयुष्य इतकं सुरक्षित आणि सुखकर असू शकतं हे जाणवलं मला तेंव्हा! एवढी श्रीमंती असूनही रजिस्टर मॅरेज केलं आम्ही आणि मी जान्हवी पाटीलची जान्हवी दीक्षित झाले!

गाडी थांबली तशी माझी विचारांची तंद्री भंग पावली. दार उघडून मला हात देऊन सत्येन्द्र हसत समोर उभे होते. 

‘ये… ये जानू… तुला आठवतोय हा तलाव? आपल्या दोघांचं नातं इथेच पक्कं झालं… हा तलाव तुझ्या माझ्या नात्याचा साक्षीदार आहे… संध्याकाळी ते सूर्यबिंब हळूहळू क्षितिजापार बुडत असताना आपण शपथ घेतली होती. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची… एकमेकांवर प्रेम करण्याची!’ 

ते भरभरून बोलत होते… नेहमी खरं तर मी भरभरून बोलत असते आणि ते ऐकत असतात पण आज सगळं उलट घडत होतं.

‘सत्येन्द्र, आपण मंदिरात जाणार होतो ना…’
‘पण का कोणास ठाऊक इकडे यावंस वाटलं…,’
‘खरं सांगा… काय आहे माझ्या रिपोर्ट्‌समध्ये?’

सत्येन्द्र शांतपणे समोरच्या संथ पाण्याकडे पाहात होता पण त्यांच्या आत प्रचंड खळबळ आहे हे मला जाणवत होतं. तिथे नीरव शांतता होती. पानांची काय ती सळसळ’फक्त जाणवत होती. मी त्यांच्या हातावर हात ठेवत प्रश्‍नार्थक नजरेनं पाहिलं आणि इतका वेळ आणलेलं उसनं अवसान गळून पडलं. त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागले. त्यांचा तो आवेग मलाही सहन होईना… तरीही मी त्यांना शांत करत राहिले. ते मात्र, मला सोडून तू कुठेही जाणार नाहीस, जायचंच नाही. मी तुझ्याशिवाय नाही गं राहू शकत अस कितीतरी बोलत राहिले. मी त्यांचे कढ ओसरू दिले. रिपोर्टस्‌ मध्ये काय असणारे त्याचा मला अंदाज आला. त्यांची ती लहान मुलासारखी अवस्था बघून माझ्या आत उठलेल्या भीतीच्या लाटांना मी थोपवून धरलं. जे असेल ते स्वीकारायचे ठरवले. एक दोनच क्षण आत प्रचंड खळबळ माजली पण दुसऱ्याच क्षणी मी शांत झाले. अतिशय शांत! मला माझ्यामुळे माझ्या घराला कोलमडू द्यायचं नव्हतं. सत्येन्द्रना सावरायचं होतं. आता मला कसलीच भीती वाटत नव्हती.

मी सत्येन्द्रना लहान मुलासारखं छातीशी धरलं होतं. त्यांना बाजूला सारत म्हटलं, ‘उठा, बघा तो आपल्या नात्याचा साक्षीदार! मी तुम्हांला आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं आहे… इथेच. घाबरू नका, मला सांगा नीट…’

‘जानू… जानू तुला कॅन्सर असेल अशी शक्‍यता वाटतेय त्यांना! तुला मुंबईला घेऊन जायला सांगितलं आहे. का… का… का? तुझ्यासारख्या चांगल्या माणसालाच का होतं हे असं? कधी कोणाशी वाईट वागली नाहीस, बोलली नाहीस. कोणी कसंही वागो आपण चांगलंच वागावं म्हणायचीस ना? कायमिळालं तुला… आणि मी? मी तरी वाईट आहे का ग? मग मला का ही शिक्षा? हं… सांग ना गं… त्याला सगळं कळतं म्हणायचीस ना? कुठे आहे आता तुझा ‘तो’!’

‘लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सत्येन्द्र’
ते रडणं विसरून माझ्याकडे पाहायला लागले. त्यांच्या डोळ्यात आश्‍चर्य दिसत होतं. वाढदिवस विसरल्याचं आणि मी इतकी शांत असल्याचं ही!

‘हे पाहा सत्येन्द्र… जे आहे ते आपल्याला स्वीकारायला हवं. मीच का? मलाच का? अशा काटेरी प्रश्‍नात अडकून पडण्यापेक्षा यातून बाहेर कसं पडायचं ते बघू… आणि आज विज्ञान इतकं प्रगत आहे, कितीतरी उपचार आहेत. मी नक्की यातून बाहेर पडेन पण… पण तुम्ही खंबीर राहिलं पाहिजे. माईंचा, दादांचा, अक्षयचा विचार करा. माई तर कोलमडून पडतील…

अक्षयचं वय लक्षात घ्या. आपण सगळं शांतपणे त्यांना समजावून सांगू. मी नक्की यातून पण तुम्हीच घाबरलात तर त्यांना कोण समजावणार, हं?’
त्यांनतर घरी आल्यावर मुंबईला जावं लागणार आणि काय कारणासाठी जावं लागणार ते सांगितलं. महादूने घरीच राहायला यायचं आणिफक्त आम्ही दोघांनी मुंबई गाठायची हे ठरलं.

आणि इथून तो दुष्ट प्रवास सुरू झाला. सततच्या टेस्ट्‌स आणि होणारी निदान आमचं विश्‍व हादरवत होती. एवढ्या मोठ्या वाड्यात राहाणारे आम्ही मुंबईत दोन खोल्यांमध्ये राहात होतो. प्रसाद ही स्वत:चा संसार सांभाळून सर्वतोपरी मदत करत होता. सत्येन्द्रनी नोकरी सोडली होती आई पूर्णपणे माझ्याबरोबर राहात होती. अक्षयची खूप आठवण यायची पण अशा अवस्थेत मला त्याने बघू नये असं वाटायचं.

मला ब्लड कॅन्सर डिटेक्‍ट झाला आणि पायाखालची जमीनच सरकली. बॉन मरो करताना झालेल्या वेदना ज्या हिमतीने मी सहन केल्या होत्या ती हिम्मत नाहीशी झाली. सत्येन्द्रच्या गळ्यात पडून मी रडले होते, मला अजून जगायचं आहे हो… इतक्‍यात नाही मरायचं.’फक्त दहा वर्षे हवीत मला. आता मात्र सत्येन्द्र शांत होते… त्यांनी माझ्या आजाराचा खूप अभ्यास केला होता. एकतर अगदीच प्राथमिक अवस्था होती आणि त्यातही माझ्या सुदैवाने एका कंपनीने सवलतीच्या दरात औषध उपलब्ध करून दिली होती. ते अतिशय ठाम सुरात म्हणाले होते, ‘नाही जानू… मी तुला इतक्‍यात मरू देणार नाही.’

आणि इथून माझा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. केमोथेरपी नंतर होणारी शरीरातली आगही माझी जगण्याची इच्छा कमी करू शकली नाही. तीन वर्षे प्रचंड वेदनेत घालवल्यावर मी जगू शकेन याची खात्री मला वाटायला लागली. मला जगायचंय आणि चांगलं जगायचंय एवढाच ध्यास मी घेतला आणि सत्येन्द्रच प्रेम, घरच्यांची काळजी, योग्य ती औषधं आणि व्यायाम, सकस आहार याच्या जोरावर मी पाचेक वर्षात पूर्ववत आयुष्य जगू लागले.

या सगळ्या प्रवासात महादू आणि प्रसादने दिलेली साथ खूपच आश्‍वासक होती. त्यांच्यामुळे माझी घराची बाजू भक्कमपणे सांभाळली गेली होती. आयुष्य पूर्ववत चालू होतंय म्हणेपर्यंत माई हार्ट ऍटॅकने आम्हाला पोरकं करून गेल्या आणि दादांचा जगण्यातला रसच संपला. वर्षभरात ते ही त्यांच्या मागोमाग गेले.

आता आम्ही मुंबईत चांगलेच स्थिरावलो होतो. अक्षय इंजिनिअर झाला होता आणि चांगली नोकरी करत होता. त्याची बायको अनन्या ही गुणी आणि हुशार होती. नाही म्हणायला मला जगण्याची उमेद, असोशी देण्यात अमू म्हणजे प्रसादच्या मुलाचा खूप मोठा हात होता. इवलासा दुपट्यात असल्यापासून मी त्याला सांभाळलं होतं आणि मागच्या वर्षी उच्च शिक्षणासाठी तो परदेशी गेला होता. खरं तर मी खूप नाराज झाले होते, खचले होते. पण पुन्हा बाहेर पडले आणि जगतेच आहे.

दारावरची बेल खणाणली आणि मी दचकले. कितीवेळ मी अशीच बसले होते. महादूने दार उघडलं आणि सगळा एकच गोंधळ सुरू झाला. अक्षय आणि अनन्या माझ्या गळ्यात पडून ‘हॅपी बर्थडे टू यू’म्हणून गात होते. प्रसाद आणि चारू पार्टीच्या तयारीला लागले होते. सत्येन्द्र माझ्याकडे अतीव प्रेमाने पाहात होते. माझ्यामुळे त्यांची झालेली फरफट आठवून डोळ्यात पाणी तरळलं.

तसं माझ्या जवळ येत म्हणाले, ‘अं हं… आज असं रडायचं नाही’
ऐका रे मुलांनो आज मी गाणं म्हणणारे, आणि त्यांनी गायला सुरुवात केली…
‘ओ मेरी जोहराजबी….’
मी खिडकीतून बाहेर पाहिलं… काळे ढग कुठेही नव्हतं. एक सर पडून गेल्यामुळे आभाळ स्वच्छ झालं होतं आणि सुंदर निळं आकाश दिसत होतं आणि सूर्याची किरणं चमचमत होती.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.