काबुल – अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर सामान्य नागरिकांचे हाल दिवसेंदिवस वाढत चालले आहेत आणि पोट भरण्यासाठी नागरिकही आता घरातील वस्तू विकण्यासाठी रस्त्यावर येऊ लागले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये रस्त्यावर विक्री करणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली असून हे लोक घरातील पलंग जुने पंखे फर्निचर कपडे यासारख्या वस्तू विकून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैसा मिळवत आहेत. दोन वेळची जेवणाची गरज पूर्ण करण्यासाठी घरातील कोणतीही वस्तू विकण्याची तयारी आता अफगाणिस्तानमधील लोकानी केली आहे.
घरातील कपडे छोट्या-मोठ्या वस्तू यांची विक्रीचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पैसे मिळवण्यासाठी येईल त्या किंमतीला या वस्तू विकत देण्याचा या नागरिकांचा कल आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची राजवट आल्यानंतर संपूर्ण व्यवस्थाच बिघडून गेली असून देशातील सर्व शहरांमधील अशीच परिस्थिती आहे.
सर्व साधारण रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांना उपचारही मिळणे आता अवघड झाले आहे. बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याने लोकांना दोन वेळचे जेवण कसे मिळवायचे याचाही विचार करावा लागत आहे. त्यातूनच घरातील वस्तू विकण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.