न्यूयॉर्क – अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे बनत आहेत, असे निरीक्षण संयुक्त राष्ट्रांच्या संशोधक विश्लेषक गटांने म्हटले आहे. संयुक्त राष्टाच्या “युरोपियन फौंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीज’च्यावतीने केलेल्या संशोधनामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील धार्मिक अभ्यास केंद्रांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या 48 व्या सत्राला दूरदृश्य पद्धतीने संबोधित करताना विश्लेषक ऍन हेकेनड्रॉफ यांनी याविषयीची चिंता व्यक्त केली. “दक्षिण आशियातील धार्मिक पाठशाळांमधून दहशतवादाबाबत चिंता करायला लावणारी स्थिती वाढत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे.
या पाठशाळांमधून नेहमीच इस्लामबाबतचे विडंबन केलेले, अतिमागास विचार शिकवले जात असतात. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून अशा धार्मिक पाठशाळा अजूनही सर्रास सुरू आहेत.’ असे त्या म्हणाल्या.
पाकिस्तानमधील अशाच मदरशांमधून तालिबान आणि हक्कानी नेटवर्कचा जन्म झाला आहे. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहंम्मद आणि अन्य दहशतवादी संघटना अशाच दहशतवादी फॅक्टींमधून वाढीस लागत असतात.
पाकिस्तानातील गुप्तचर संघटनेचेही त्यांना संरक्षण असते, असेही त्या म्हणाल्या. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात असे अनेक बेकायदेशीर मदरसे जिहाद पोसत आहेत. अन्य धर्मियांचा द्वेष आणि “गन कल्चर’चे प्रशिक्षणच या सदरसांमधून दिले जात असते, असेही त्या म्हणाल्या.