पुणे – शहरातील करोनाची साथ नियंत्रणात येत असल्याचे चित्र असतानाच आणि निर्बंध आणखी शिथिल होण्याची अपेक्षा असतानाच अवघ्या दोन आठवड्यांतच शहरात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा निर्बंध वाढविण्यात आले आहेत.
त्यानुसार, आता दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेतच सुरू राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांसाठी संध्याकाळी 5 नंतर शहरात संचारबंदी असणार आहे. येत्या सोमवार (दि. 28) पासून ही नियमावली लागू असेल.
राज्यात करोना रूग्णसंख्येत सुरू असलेला चढ उतार आणि केंद्रशासनाकडून डेल्टा प्लस या करोनाच्या उत्परिवर्तन झालेल्या प्रकाराचा धोका लक्षात घेऊन शासनाने संपूर्ण राज्यासाठी नवीन प्रतिबंधात्मक नियामावली जाहीर केली आहे, त्यानुसार, पुणे शहरातही रूग्णसंख्या नियंत्रणात असली आणि बेडची उपलब्धता असली तरी हे नवीन निर्बंध असणार आहेत.
या सुधारीत आदेशानुसार, अत्यावश्यक सेवांची दुकाने आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील तर, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ते 7 ते सायंकाळी 4 पर्यंत सुरू राहणार असून शनिवार, रविवार ही दुकाने बंद असतील.
त्यामुळे शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवासाठीचे विकेंड लॉकडाऊन कायम असणार आहे. तर उद्याने आणि मैदाने केवळ सकाळी 5 ते 9 या वेळेतच सुरू राहणार असून संध्याकाळी ती बंद असणार आहेत. तर खासगी कार्यालयाने कामाच्या दिवशी 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
असे असतील नवीन नियम
सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने दररोज दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू
इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी
4 वाजेपर्यंत सुरू
मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, संपूर्णत: बंद
रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत
पार्सल सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू
लोकल ट्रेन फक्त वैद्यकीय, अत्यावश्यक आणि शासकीय सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी
सार्वजनिक उद्याने, मैदाने, चालणे व सायकलिंग सकाळी 5 ते 9 पर्यंत सुरू
सर्व खासगी कार्यालये 50 टक्के कर्मचारी क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत
अत्यावश्यक सेवातील कार्यालये
100 टक्के क्षमतेने
आउटडोअर स्पोर्टस सकाळी 5 ते 9 या वेळेत
सर्व प्रकारचे कार्यक्रम 50 लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत
सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद. दैनंदिन पूजा-अर्चासाठी परवानगी
अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीसाठी 20 लोकांची उपस्थिती
शेतीसंबंधित दुकाने आणि शेतमालाची विक्री दुपारी 4 वाजेपर्यंत
मनपा हद्दीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी, सायंकाळी 5 नंतर संचारबंदी
व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, 50 टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार दुपारी 4 वाजेपर्यंत
पीएमपीएमएल 50 टक्के क्षमतेने धावणार
मद्यविक्री दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू
शनिवार आणि रविवारी होम डिलिव्हरी सुरू राहणार