इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान उद्या (रविवारी) आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे वृत्त पसरले आहे. उद्या इस्लामाबादेत होणाऱ्या एका सभेदरम्यान ते आपल्या राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन मुदतपूर्व निवडणूका घेण्याचा इम्रान खान यांचा इरादा असल्याचे वृत्त या वाहिनीने दिले आहे. इम्रान खान यांच्यावर आता पाकिस्तानच्या लष्कराचाही विश्वास राहिला नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे.
इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी मोठी आघाडी उघडली आहे. तब्बल 20 विरोधी पक्षांनी एकत्र येऊन त्यांच्याविरोधात संसदेत अविश्वास ठराव आणला आहे. सत्तारुढ तेहरीक ए इन्साफ पार्टीच्याही काही सदस्यांनी विरोधकांना साथ देण्याचे ठरवले असल्यामुळे आता इम्रान खान यांच्याविरोधातील आघाडी अधिकच भक्कम बनली आहे. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या 172 जणांचा पाठबळ मिळवण्याचा विश्वास विरोधकांकडून व्यक्त होऊ लागला आहे.
त्यातच पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशिद यांनी मुदपूर्व निवडणुकांची चाचपणी करायचे वक्तव्य केले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठीचे अंदाजपत्रक संसदेत सादर झाल्यानंतर लगेचच या मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यावरूनच इम्रान खान हे मुदतीपूर्वीच राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.