इस्लामाबाद – संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पख्तुन वंशाच्या नागरिकांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. तालिबानला पख्तुन लोकांकडून सहानुभूती देण्यात येत असल्याचे इम्रान म्हणाले होते. त्यावरून पाकिस्तानातील विरोधी नेत्यांनी इम्रान खान यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आवामी नॅशनल पार्टीचे सरचिटणीस मियां इफ्तिकार हुसैन यांनी ही टीका केली आहे.
तालिबानला पख्तुनकडून सहानुभूती मिळत असल्याचे म्हणून पंतप्रधान इम्रान खान यांनी इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला आहे, असे हुसैन म्हणाले. आम्ही पख्तुन आहोत. मात्र आम्ही कधीही दहशतवादाचे समर्थन केलेले नाही. आम्ही तालिबानला कधीही सहानुभूती दाखवलेली नाही. पख्तुन लोकांना तालिबानबरोबर जोडून केवळ इतिहासाची मोडतोड केली जाते आहे, असे हुसैन म्हणाले.
तब्बल 80 हजार लोकांनी दहशतवादाविरोधात लढताना आपले प्राण गमावलेले आहेत. त्यात बहुसंख्य पख्तुन आहेत. त्यात पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलमधील 144 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे, असेही हुसैन यांनी सांगितले.
इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये केलेल्या भाषणात अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमा भागातील पख्तुन लोकांचा तालिबानला पाठिंबा असल्याचा दावा केला होता.