येरवडा – मर्जीतल्या ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांकडून “रिंग” करून पात्र ठेकेदारांना अपात्र करण्याचा उद्योग येरवडा क्षेत्रीय कार्यालयात सुरू आहे. याप्रकरणी पात्र ठेकेदारांनी सह महापालिका आयुक्तांकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. या गंभीर तक्रारीची नोंद न घेतल्यास थेट कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचे पात्र ठेकेदार यांनी यावेळी सांगितले.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत महापालिकेच्या वेबसाईट वरून विकास कामांसाठी जाहीर निविदा काढण्यात आली होती. त्याची जाहिरात दैनिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. सदरच्या कामाचा ठेका मिळवण्यासाठी ठेकेदारांकडून नियमानुसार निविदा विहित वेळेत भरण्यात आल्या होत्या. मात्र येरवडा क्षेत्रीय कार्यालयातुन मुख्य खात्यात बदली झालेल्या कनिष्ठ अभियंत्याने मर्जीतील ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने पात्र ठेकेदारांना त्यातून वगळले.
संबंधित कामासाठी सर्व अटी शर्ती पूर्ण केलेल्या असल्यामुळे ते काम मात्र ठेकेदारांनाच मिळणे गरजेचे होते. संबंधित कनिष्ठ अभियंता गेली अनेक वर्षांपासून हाच उद्योग वारंवार करत असल्याचा आरोप देखील पात्र ठेकेदारांनी केला आहे. या निविदेमध्ये देखील असा घोटाळा होण्याची शक्यता लक्षात घेऊन पात्र ठेकेदारांनी त्यांना निविदा प्रक्रियेतून अपात्र करू नये अशी लेखी विनंती सहमहापालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्याकडे यापूर्वीच केली होती.
नियम धाब्यावर बसवत केवळ लोकप्रतिनिधींनी नियुक्त केलेल्या ठेकेदारासाठीच काम करणाऱ्या महापालिकेच्या “रिंग मास्टर” अभियंत्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत हा “पराक्रम” केला आहे. याप्रकरणी पात्र ठेकेदारांना अपात्र केल्यामुळे त्याची लेखी तक्रार सह महापालिका आयुक्तांकडे केली. या तक्रारीनंतर सदर अपात्र ठेकेदारांचा सह लोकप्रतिनिधींच्या कार्यालयातून तक्रार मागे घेण्यासाठी पात्र ठेकेदारांना फोन येऊ लागले आहेत. मात्र नियमांची पायमल्ली करत रिंग करणाऱ्या ठेकेदारांना पोसणाऱ्या अधिकाऱ्यांना चाप बसावा यासाठी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे पात्र ठेकेदार यांनी यावेळी सांगितले.
तक्रारीची दखल न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. एकंदरीतच महापालिका प्रशासनात विकास कामाच्या नावाखाली लोकप्रतिनिधी ठेकेदार व अधिकारी यांच्याकडून लाखो रुपये निधीचा अपहार सर्रास होतो मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित कनिष्ठ अभियंत्यास संपर्क साधला असता “थोडं थांबा बघतो…..” अशी माहिती मिळाली.
एकाद्या कामाची निविदा काढली असता ठेकेदारांनी ऑनलाइन निविदा भरावयाच्या असतात.त्यांच्याकडील कागदपत्रांची पुर्तता देखील ऑनलाइन फीड केलेले असतता त्यात जर कागदपत्र अपुर्ण असतील तर ती पुर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी संबधिताला कळवायचे असते मात्र या प्रकरणामध्ये संबधित अधिकाऱ्यांने याला बगल दिली असल्याचे दिसते.