कोल्हापूर – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आज मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी पोलिस ठाण्याबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती.
अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर किरीट सोमय्या कळंबा मार्गे इस्पुरली तुरंबे मुदाळतिट्टा या मार्गाने मुरगुडमध्ये दाखल झाले. तुरुंबे आणि मुदाळ तिठा येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुरगुडमध्ये आल्यावर त्यांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
किरीट सोमय्या येणार म्हणून मुरगुडमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुरगूड ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. पोलीस ठाण्याबाहेर आल्यावर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मानवाधिकाराकडे तक्रार देणार असल्याचे सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितले.
किरीट सोमय्यांनी 3 तक्रारी दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील हे दिवंगत गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांचे सख्खे बंधू आहेत. राष्ट्रवादीचे नेते असलेले हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील तक्रार राष्ट्रवादीच्या दिवंगत नेत्याच्या पोलीस भावाकडे करण्यात आली. यावेळी पोलिस स्थानकात किरीट सोमय्या यांनी आर आर आबांच्या आठवणींना उजाळा दिला.
हसन मुश्रीफ यांनी बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्यांचा आहे. त्याचीच तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या मुरगूड पोलिसात गेले. यावेळी किरीट सोमय्या यांची तक्रार कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील यांनी स्वीकारली.
आबा यांच्या सारखे नव्हते
मला सुरवातीला कोल्हापुरात येऊ दिले नाही. त्या बद्दल राज्यपालांना भेटून तक्रार करणार आहे. तसेच दिल्ली येथे मानवाधिकार आयोग यांच्याकडे देखील दाद मागणार आहे. आर आर आबा चांगले होते, सज्जन होते, सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यासारखे नव्हते, मला बऱ्याचदा सल्ला द्यायचे आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो, असे किरीट सोमय्या यांनी पोलीस अधीक्षक राजाराम पाटील यांना सांगितले.