नवी दिल्ली – गैर इस्लामी पद्धतीने निकाह केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांना न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. बुशरा बिबी यांचे प्रथम पती ख्वाजा मनेका यांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. दुसरा निकाह करण्यापूर्वी आवश्यक असलेला इद्दतचा कालावधी पाळण्याबाबतच्या इस्लामी कायद्याचा भेग बुशरा बिबी यांनी केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आपली पूर्व पत्नी आणि इम्रान खान यांच्यात निकाह होण्यापूर्वी अनैतिक संबंध होते, असा आरोप देखील त्यांनी केला होता. इस्लामी कायद्यांतर्गत अनैतिक संबंधांना देहदंडाची शिक्षा आहे. .
इतर प्रकरणांप्रमाणे या प्रकरणाची सुनावणी देखील अदियाला तुरुंगातच करण्यात आली. आतापर्यंत इम्रान खान आणि बुशरा बिबी या दोघांचेही निवेदन नोंदवून घेण्यात आले आणि ४ साक्षीदारांची उलट तपासणी देखील करण्यात आली आहे. ख्वाजा मनेका यांनी न्यायालयात सादर केलेले घटस्फोटाचे १४ नोव्हेंबर २०१७ रोजीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा बुशरा बिबी यांनी केला आहे.
उलटपहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर एप्रिल ते ऑगस्ट २०१७ दरम्यानचा इद्दत कालावधीचे पालन केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बुशरा बिबी आणि इम्रान खान यांचा निकाह सोहळा १ जानेवारी २०१८ रोजी झाला होता. निकाहानंतर त्या इम्रान खान यांच्या राजकीय जीवनामध्ये वारंवार हस्तक्षेप करत राहिल्या होत्या.
न्यायालयाने १४ तासांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर इम्रान खान आणि बुशरा बिबी या दोघांनाही दोषी ठरवले. यापूर्वी इम्रान खान यांना सायफर गैरव्यवहार प्रकरणी १० वर्षांची आणि पती पती दोघांनाही तोशखाना गैरव्यवहार प्रकरणी १४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोघांनाही मोठा दंड आणि सार्वजनिक पद स्वीकारण्यास देखील १० वर्षे बंदी घालण्यात आली आहे.