नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची (Congress National Executive) बैठक उद्या (रविवार) होणार आहे. त्या बैठकीत पक्षाचे नवे अध्यक्ष ठरवणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला जाणार असल्याचे समजते. माजी अध्यक्ष राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पुन्हा धुरा स्वीकारावी अशी बहुतांश कॉंग्रेसजनांची इच्छा आहे.
मात्र, पुन्हा अध्यक्षपद न स्वीकारण्याच्या भूमिकेवर राहुल अद्याप ठाम आहेत. त्यामुळे कॉंग्रेससमोर अध्यक्ष निवडीचा पेच उभा राहिल्याचे मानले जाते. त्या पार्श्वभूमीवर, अध्यक्ष निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित केल्या जाऊ शकणाऱ्या बैठकीचे महत्व वाढले आहे.
ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी शुक्रवारी कॉंग्रेसला (Congress) रामराम ठोकला. कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचे जाहीर करताना आझाद यांनी पक्षाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी प्रामुख्याने राहुल यांच्यावरही निशाणा साधला.
त्या घडामोडीमुळेही पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीविषयीची उत्सुकता वाढली आहे. बैठकीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला जाईल, अशी माहिती पक्षाच्या सुत्रांकडून देण्यात आली. (Important meeting of Congress executive tomorrow; There will be a discussion on the presidential election)