नवी दिल्ली – नव्या तंत्रज्ञानावर आधारित वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी परंपरागत बॅंकिंग क्षेत्रासमोर आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे बॅंकिंग क्षेत्रात अभूतपूर्व बदल होत आहेत. त्याचा परिणाम परंपरागत बॅंकिंग क्षेत्रावर होत असल्यामुळे नव्या कंपन्यांनाही बॅंकिंग क्षेत्राप्रमाणे नियम लागू करावेत असा आग्रह बॅंकांनी करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ बॅंकर के व्ही कामत यांनी व्यक्त केले आहे.
बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेच्या अनेक नियमांचे पालन करून काम करावे लागते. मात्र नव्या तंत्रज्ञानावर आधारित वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्या वेगाने पुढे जाऊन बॅंकिंग क्षेत्रावर परिणाम करीत आहे. त्यामुळे सर्वांना सारखे नियम असावेत असा आग्रह बॅंकांनी रिझर्व बॅंकेकडे धरण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले. कामत म्हणाले की, बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रामध्ये नव्या डिजिटल संधी निर्माण झाल्या आहेत.
त्यामुळे बॅंकांनी प्रत्येक काम करताना ते डिजिटल कसे होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण आता ग्राहकही डिजिटल वित्तीय सेवांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. बॅंकांना जे नियम आहेत ते नव्या कंपन्यांना नाहीत असे कामात यांना वाटते. फिक्कीने या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात बोलताना कामत म्हणाले की, बॅंकांनी याची गंभीर दखल घेऊन नियंत्रकांकडे सर्वांना समान नियम लागू करण्याची मागणी करण्याची गरज आहे. नव्या कंपन्यांमुळे परंपरागत बॅंकिंग व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. नव्या आणि जुन्या कंपन्यांना सारख्या नियमनाची गरज आहे.
डिजिटल अर्थव्यवस्थेत चीन पुढे
डिजिटल अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सध्या भारतामध्ये केवळ 4 ते 5 टक्के एवढी डिजिटल अर्थव्यवस्था आहे. मात्र चीनमध्ये हेच प्रमाण 40 टक्के आहे. पुढील 2 वर्षांमध्ये डिजीटल अर्थव्यवस्थेत फार तर आपण 5 ते 40 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. तोपर्यंत चीन आपल्या कितीतरी पुढे गेला असेल असे त्यांनी सांगितले.