वाघोली -ग्रामपंचायत शिरसवडी (ता. हवेली) हद्दीत असणाऱ्या प्रिकास्ट इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला डोंगरगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीवरून होणारा बेकायदा पाणीपुरवठा तातडीने बंद करणेबाबत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बाळासाहेब गावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
गावडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ग्रामपंचायत शिरसवडी यांचे तर्फे सरपंच दीप्ती सतीश नागवडे, ग्रामसेवक आर. आर. दवणे प्रिकास्ट इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये 18 डिसेंबर 2015 रोजी पाण्याच्या योजनेबाबत पाचशे रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर झालेल्या करारनाम्यानुसार ग्रामपंचायत शिरसवडीला पाणीपुरवठा योजना सुरू करण्याबाबत डोंगरगाव येथील गट नंबर 75 या मिळकती पैकी तीन आर क्षेत्र विहिरीसाठी ग्रामपंचायतीने विकत घेतले.
या जागेतून शिरसवडी ग्रामस्थांसाठी पाण्याची योजना राबविण्याबाबत निर्णय घेतला. या योजनेतील नियम व अटीनुसार डोंगरगाव हद्दीतील याच विहिरीतून गावकऱ्यांना व प्रिकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पाणी देण्याबाबत नियोजन करण्यात आले.
याबाबतचा ग्रामपंचायत व कंपनी यांच्यातील खर्चाचा हिस्सादेखील ठरवण्यात आला. याशिवाय या पाण्याच्या उपसा कामी लागणाऱ्या विजेचा एकूण खर्चदेखील करण्याबाबत नियोजन करण्यात आले. ही योजना डोंगरगाव हद्दीतील विहिरीतून शिरसवडी गावापर्यंत अशा स्वरूपात नियोजित करण्यात आली. मात्र, सध्या डोंगरगाव हद्दीतील असणाऱ्या भीमा नदीतून शिरसवडी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या वतीने योग्य त्या परवानग्या घेऊन योजना पुढे कायम ठेवण्यात आली; मात्र याच परवानगीचा गैरफायदा घेऊन नदीच्या पाण्याचा वापर औद्योगिक क्षेत्र म्हणजेच प्रिकास्ट इंडिया लिमिटेडसाठी सध्या बेकायदेशीरपणे चालू आहे.