प्रयागराज – प्रयागराजमधील हिंसाचार प्रकरणातील आरोपीच्या घरावर करण्यात येत असलेल्या बुलडोझर कारवाईदरम्यान घरामध्ये लपवून ठेवलेल्या बेकायदेशीर बंदुका सापडल्या असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आज सकाळी बुलडोझर कारवाईच्या पूर्वी घराची तपासणी केली असता, या बंदुका सापडल्या असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या जावेद मुहम्मद याच्या घरावर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली, तेंव्हा ही शस्त्रे सापडली. सापडलेल्या शस्त्रांमध्ये 12 बोअर आणि 315 बोअरची पिस्तुले आणि काही काडतुसेही सापडली आहेत. न्यायालयाच्या निकालासंदर्भात काही आक्षेपार्ह मजकूर असलेली कागदपत्रेही सापडली आहेत, असे प्रयागराजचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय कुमार,यांनी सांगितले.
वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचा नेता असलेल्या जावेद मुहम्मदचे घर दुपारी बुलडोझरच्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आले. घराच्या तळ मजल्यावरील आणि पहिल्या मजल्यावरील बांधकाम अवैध असल्याची नोटीस घरावर चिकटवण्यात आली होती. या कारवाई संदर्बातील नोटीस मे महिन्यात बजावण्यात आली होती. मात्र त्याला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नव्हता, असेही यो नोटीसीमध्ये म्हटले गेले आहे.