मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राष्ट्रपतीपद येणार असेल तर कॉंग्रेसचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल, तसेच याचा आपल्याला आनंदच होईल, असे ट्विट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केले आहे.
शरद पवार हे देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा त्यांच्या समर्थकांनी वारंवार व्यक्त केली आहे. गेल्या दोन दशकांपासून देशाच्या व विशेषत: महाराष्ट्राच्या राजकारणात ही चर्चा सुरू असते. स्वत: पवार यांनी आपले संख्याबळ यासाठी पुरेसे नसल्याची समर्थकांना वास्तवाची जाणीव करून दिली असली तरी त्यांच्या या पदासाठी दावा करणारे नाउमेद झालेले नाहीत. मात्र आता गेल्या काही काळापासून पंतप्रधान पदाने हुलकावणी दिल्यानंतर प्रणव मुखर्जी जसे राष्ट्रपती झाले, तसेच पवारही राष्ट्रपती होतील या अपेक्षेने त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
पवार किंवा त्यांच्या कोणा निकटवर्तीयाने याबाबत जाहीर काही भाष्य केलेले नाही. मात्र पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही सलोख्याचे संबंध आहेत. राष्ट्रपती पदावर आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून आणण्याइतपत संख्याबळ सध्या भाजपकडे नाही. त्यामुळे सर्व सहमतीचा उमेदवार म्हणून पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो या कयासातून हल्ली चर्चा होत असतात. त्यामुळेच पवारांचे नाव पुढे आले आहे. आता महाराष्ट्रातील नेते म्हणून पटोले यांनीही सकारात्मक भूमिका पवार यांच्याबाबत मांडली आहे.