– पर्यावरण प्रेमींची नाराजी
पिंपरी, दि. 8 – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध वृक्ष तोडीचे सत्र सुरूच आहे. कोणतीही परवानगी नसताना भोसरी, एमआयडीसी येथील मोकळ्या भूखंडावरील वृक्षांची अवैधपणे तोड केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी प्रशांत राऊळ यांनी केला. त्यांनी जागेवर जाऊन हा प्रकार उघडकीस आणला असून या घटनांमुळे पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या वृक्षतोडीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी अवैध वृक्षतोड सुरू असून महापालिका प्रशासनाचे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षांची तोड होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून सातत्याने केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी एका उद्यानातील वृक्षांची अवैधपणे कत्तल केली होती. ही घटना ताजी असतानाच भोसरी एमआयडीसी येथील मोकळ्या भूखंडावरील वृक्षतोड करण्यात आली आहे. भोसरी, एमआयडीसीतील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या पाठीमागे मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर गर्द झाडी होती. तेथील वृक्ष बुद्यांपासून तोडले जात आहेत. तोडणाऱ्यांकडे े महापालिकेची कोणतीही परवानगी दिसली नाही. तसेच भूखंडावरील मोठ्या झाडांची अवैधपणे तोड झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या विषयी प्रशांत राऊळ म्हणाले की, महापालिकेकडून वृक्ष अधिनियमांचे सतत उल्लंघन केले जात आहे. महापालिका वृक्ष गणनेचा तपशील देत नाही. वृक्ष गणनेत 32 लाख झाडे दाखविली आहेत. पण, महापालिकेकडून जाणीवपूर्वक वृक्षगणनेची माहिती दिली जात नाही. त्यामुळे उद्यान विभागाची भूमिका संशायस्पद वाटते. वृक्षतोडीत सहभागी असल्याप्रकरणी उद्यान विभागाचे चार कर्मचारी निलंबित आहेत. उद्यान विभागाच्या दुर्लक्षपणामुळे शहराचे वृक्ष सौंदर्य धोक्यात अले आहे.
तक्रारींकडे दुर्लक्ष
अवैध वृक्षतोडीचा तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केले जाते. गुन्हा दाखल झालेल्या केसेसमध्ये गुन्हेगारांना वाचवण्यासाठी कारवाही न करण्याचे पोलिसांना पत्र दिले जाते. पकडलेले गुन्हेगार व मुद्देमाल सोडून दिला जातो. सारथी वरील तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. अवैध वृक्षतोडीमध्ये सापडलेले कर्मचारी यांना वाचवण्यासाठी कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप प्रशांत राऊळ यांनी केला आहे.