बागवे करंडक खुली फुटबॉल स्पर्धा
पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक आयोजित बागवे करंडक खुल्या फुटबॉल स्पर्धेत आयएफा, रेंजहिल्स यंग बॉईज आणि दिएगो ज्युनिअर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (पीडीएफए) ढोबरवाडी येथील स्पर्धेत अनिरुद्ध चाको याने केलेल्या गोलच्या जोरावर रेंजहिल्स यंग बॉईज संघाने डेक्कन इलेव्हन ब संघाचा 1-0 असा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
आयएफा संघाने टायगर कम्बाईन संघाचा टायब्रेकमध्ये 5-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. आयएफा संघाकडून श्रेयस बोरकर याने तर, टायगर कम्बाईन संघाकडून उत्तरार्धात नितीन भुतकर याने गोल केला. सामन्यात पूर्णवेळ 1-1 अशी बरोबरी झाल्याने टायब्रेक पध्दतीचा अवलंब करण्यात आला.
गॅरी मार्टीन याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर दिएगो ज्युनिअर्स संघाने केशव माधव प्रतिष्ठानचा 3-0 असा सहज पराभव केला. तीनही गोल सामन्याच्या उत्तरार्धात झाले. दिएगोच्या शुभम महापडीने एक तर गॅरी मार्टीनने दोन गोल करून संघाला विजयी सलामी मिळवून दिली.