श्रेष्ठ संगीतनाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ निलफलकाचे अनावरण
पुणे – श्रेष्ठ संगीतनाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्करांच्या “संगीत शाकुंतल’ या नाट्याच्या सादरीकरणाला शनिवारी 140 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त पूर्वसंध्येला किर्लोस्कर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेल्या नाट्यगृहाच्या (सध्याचे वसंत टॉकिज) प्रवेशद्वारापाशी बसविलेल्या निलफलकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले.
मराठीतील श्रेष्ठ संगीतनाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ किर्लोस्कर नाट्यमंडळी आणि टापरे परिवाराने सन 1909 मध्ये सध्याच्या वसंत टॉकिजच्या जागी नाट्यगृह बांधले. किर्लोस्करांच्या “संगीत शाकुंतल’ या पहिल्या व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगाला दि. 31 रोजी 140 वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून पुणे महापालिका, संवाद आणि वसंत टॉकिजच्या वतीने शुक्रवारी निलफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विलास टापरे, “संवाद’चे सुनील महाजन, रवी खरे, सहायक आयुक्त आशीष महादळकर आदी उपस्थित होते.
संगीत प्रेमींच्या मनावर अधिराज्य
अण्णासाहेब किर्लोस्करांनी “संगीत शाकुंतल’ रंगमंचावर आणले. या नाटकामुळे व्यावसायिक मराठी संगीत नाट्यांची मुहूर्तमेढ रोवली. या नाटकाचा पहिला प्रयोग 31 ऑक्टोबर 1880 रोजी “आनंदोद्भव’ नाट्यगृहात झाला. या नाटकातील “पंचतुड नररुंड मालधर’, “काय मला भूल पडलि’, “जाई परतोनी बाळा’ आदी पदे अजरामर ठरली आहेत.
शाकुंतलच्या बरोबरीने शाकुंतल, सौभद्र, शारदा, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ आदी संगीत नाटकांची नोंद किर्लोस्करांच्या नावे असून, आजही ही नाटके संगीत प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवतात.