नवी दिल्ली – रस्त्यावरील जुन्या वाहनांची संख्या कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जुन्या वाहनांची संख्या कमी व्हावी या उद्देशाने मंत्रालयातर्फे सरकारकडे एक प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यामध्ये २० वर्षांपेक्षा जुन्या खासगी वाहनांच्या व १५ वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणाचे शुल्क २५ पटीने वाढवण्याचा समावेश आहे.
हा प्रस्ताव मंजूर झाल्यास व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचण्यांचे शुल्क तब्बल १२५ पटीने वाढणार आहे. असं असलं तरी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचा हा प्रस्ताव सध्या प्राथमिक स्वरूपात असून मंत्रालयाने या प्रस्तावावर विविध विभागांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार मंत्रालयाच्या या प्रस्तावानुसार व्यावसायिक वाहनांना फिटनेस चाचणीसाठी २५००० रुपये मोजावे लागतील. या चाचणीसाठी सध्या २०० रुपये इतके शुल्क आकारले जाते. याखेरीज कॅब, मिनी ट्र्क या वाहनांसाठी १५ ते २० हजार इतके शुल्क आकारण्यात येईल. खासगी वाहनांसाठी फिटनेस चाचणीच्या शुल्कामध्ये कोणतेही बदल सुचवण्यात आले नाहीत. मात्र या वाहनांना नोंदणी नूतनीकरणासाठी १५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या हे शुल्क केवळ ६०० रुपये इतके आहे.
मंत्रालयाच्या या प्रस्तावामध्ये दुचाकी व तीन चाकी वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणासाठीही शुल्कवाढ सुचवण्यात आली आहे. सध्या नूतनीकरणासाठी आकारण्यात येणारे ३०० रुपये इतके शुल्क वाढून २००० ते ३००० रुपये करण्याचा उल्लेख या प्रस्तावामध्ये आहे.
दरम्यान, नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये देखील जुन्या वाहनांचा वापर कमी करून नव्या तंत्रज्ञानावर आधारित पर्यावरणपूरक वाहनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.