दुबई – आयपीएल 2020 च्या पर्वामध्ये आज राजस्थान व हैदराबादचा संघ एकमेकांसमोर उभा ठाकला होता. १५५ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यामुळे हैदराबादच्या संघाने हा सामना केवळ 18.1 षटकांमध्येच आठ गडी राखत जिंकला. हैदराबादकडून मनीष पांडेने सर्वाधिक ८७ धावांची नाबाद खेळी केली.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सची चांगल्या सुरुवातीनंतरही पडझड झाली. त्यांचा डाव 20 षटकांत 6 बाद 154 धावांवर रोखण्यात हैदराबादला यश आले. नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने राजस्थानला फलंदाजीसाठी पाचारण केले.
सलामीवीर रॉबीन उथप्पा व बेन स्टोक्सने 3.3 षटकांत 30 धावांची सलामी दिली. मात्र, चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. स्टोक्सने संजू सॅमसनच्या साथीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने 56 धावांची भागीदारी केली.
या स्पर्धेत पहिलाच सामना खेळणाऱ्या जेसन होल्डरने सॅमसनचा त्रिफळा उडवला व ही जोडी फोडली. त्यानंतर लगेचच याने रशिद खानने स्टोक्सचा त्रिफळा उडवला. यावेळी राजस्थानची 3 बाद 86 अशी स्थिती बनली होती. कर्णधार स्टिव्ह स्मिथ व जोस बटलर ही जोडी खेळपट्टीवर जमली. बटलरने मात्र, निराशा केली. त्यांनी संघाचे शतक फलकावर लावले व बटलर विजय शंकरच्या गोलंदाजीवर बाद झाला.
स्मिथने रियान परागच्या साथीत धावसंख्या वाढवायला सुरुवात केली. मात्र, तोदखील अनावश्यक फटका मारून बाद झाला. लगेचच परागही तंबूत परतला. ही जोडी वेगाने धावा जमवेल ही अपेक्षा फोल ठरली. परागने 2 चौकार व 1 षटकार फटकावताना 20 धावांची खेळी केली. राहुल तेवतिया व जोफ्रा आर्चर यांनी संघाला दीडशे धावांच्या पुढे पोहोचविले.
त्यातही आर्चरने 7 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 16 धावा केल्या. तेवतिया 2 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादच्या जेसन होल्डरने 3 गडी बाद केले. रशिद खान व विजय शंकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.