सिंधुदुर्ग – वैभववाडीतील करुळ घाटात सनसेट पॉईंटवरुन 700 फूट खोल दरीत कार कोसळली. दैव बलवत्तर म्हणून कारमधील दोघांचा जीव वाचला आहे. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात गाडीतील दोन प्रवासी दरीत कोसळले.
रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी वैभववाडी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर वैभववाडी पोलीस पथक आणि सह्याद्री जीवरक्षक टीम करुळ घाटात पोहोचली. त्यांनी अपघातग्रस्तांचा शोध घेत रात्री उशिरा दोघांनाही वाचवले. दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आले.
सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील शेखर राणे आणि त्यांच्या पत्नी दर्शना कोल्हापूरवरुन कारने घरी जात होते. यावेळी वैभव करुळ घाटातून येत असताना त्यांचा कारवरील ताबा सुटला. यानंतर कार करुळ घाटातील सणसेट पॉईंटवरुन 700 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात राणे दाम्पत्य बालंबाल बचावले.
राणे दाम्पत्यांना वाचवणाऱ्या प्रत्येकाला कार खाली कोसळून देखील हे कसे वाचले याचे आश्चर्य वाटत होते. कारण तब्बल 700 फूट खोल दरीत कार कोसळूनही या दोघांचा जीव वाचला. ही घटना गुरुवारी (29 जून) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.