मुंबई – एक जुलै रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या आदल्या दिवशी ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. कनाल यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पक्षाला जय महाराष्ट्र करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कनाल हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेच्या वांद्रे पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या सर्व पदांना ठाकरे गटाने स्थगिती दिली आहे. युवा सेना मध्यवर्ती कार्यालयाने अधिकृतरीत्या यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर कनाल यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त करत, याचे दुःख होत असल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून कनाल म्हणाले की, “दुःख होतेय, हे कोणी केले हे चांगलेच माहिती आहे. पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केले, त्यांना न ऐकता काढून टाकणे म्हणजे हा अहंकार आहे. तुम्ही मला हटवू शकलात, पण त्या लोकांना नाही, या लोकांनी रात्रंदिवस काम केले आहे. चला ठीक आहे, सर्वांनाच माहिती तर झाले की, इगो किंवा अहंकार काय असतो ते.’
कनाल हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. आगामी काळात मुंबई महापालिकेसह इतर निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी ठाकरे गटामध्ये सुरु असलेली गळती रोखण्याचे आव्हान उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांसमोर आहे.