कोल्हापुरातील पतसंस्थांना पीएमसीचा कोट्यवधींचा गंडा

कोल्हापूर : आर्थिक घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बॅंकेत कोल्हापुरातील पतसंस्थांचे कोट्यावधी रुपये अडकले असल्याचे समजते. रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातलेल्या या बॅंकेत हजाराहून अधिक पतसंस्थांचे सुमारे 800 कोटी रुपये अडकल्याचे समजते.अन्य बॅंकापेक्षा दिलेला अधिक दर यामुळे अनेक पतसंस्थांनी आपल्याकडे जमा झालेल्या ठेवी पीएमसी बॅंकेत ठेवल्या. मात्र अचानक बॅंकेवर आर्थिक निर्बंध आल्याने पतसंस्थांसह त्यांच्या ठेवीदारांचेही धाबे दणाणले आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने याविषयात पुढाकार घेतला आहे. नुकतीच फेडरेशनच्या पुढाकाराने मुंबईत पीएमसी बॅंकेत ठेवी अडकलेल्या पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मुंबईसह नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरमधील पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डिपॉझिट इन्श्‍युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे (डीआयसीजीसी) बॅंकांनी प्रीमियमपोटी सुमारे 58 हजार कोटी रुपये भरले आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 96 कोटी 20 लाख रु.चे दावे करण्यात आले. अशा परिस्थितीत “डीआयसीजीसी’च्या मदतीने पीएमसी बॅंकेवरील साडेसहा हजार कोटींचे कर्ज फेडून सामान्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.