“आमचं ठरलंय’वाल्यांची दुकानदारी या निवडणुकीत बंद पडणार

जयकुमार गोरे; जनतेचा स्वाभिमान विकत घेऊ पाहणाऱ्याचा पालापाचोळा होणार
सातारा –
“आमचं ठरलंय’वाल्यांची आपापसात सुरू असलेली दुकानदारी जनता या निवडणुकीत बंद पाडणार आहे. पतसंस्था बुडवणाऱ्या, बॅंकेच्या जीवावर घर चालवणाऱ्या, सूतगिरणीचे पैसे खाणाऱ्या आणि आयुष्यभर “टेबलाखालून’ माल घेऊन जनतेला लुबाडणाऱ्यांना मतदार कायमचा धडा शिकवतील, असा विश्‍वास जयकुमार गोरे यांनी व्यक्‍त केला.

वही, पेन, साड्या वाटून माण-खटावचा स्वाभिमान विकत घेऊ पहाणाऱ्याचा तर या निवडणुकीत पालापाचोळाच होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला. मायणी, कुकुडवाड गटातील जाहीर सभांमध्ये ते बोलत होते. डॉ. एम. आर. देशमुख, मानसिंगराव देशमुख, जालिंदर माळी, संजय भगत, श्रीमंत पाटील, संजय साळुंखे, धोंडिराम मोरे, रामभाऊ पाटील, महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

जयकुमार गोरे म्हणाले, बहुजन समाजात भांडणे लावायचे काम पवारांनी कायमच केले. त्याच पवारांचे पाय धरणारे लोधवडेचे प्रभाकर देशमुख जातीपातीचे राजकारण करून मतांचा जोगवा मागत आहेत. पैसे वाटून जनतेला विकत घेत आहेत. मात्र, त्यांना पुन्हा उठता येणार नाही इतक्‍या जोरात स्वाभिमानी जनता त्यांना आपटणार आहे. तुम्ही रात्री बारा वाजता मदतीसाठी हाक मारली तरी हा जयकुमार तत्पर आहे. गोपीनाथ मुंडेसाहेबांच्या विचारांच्या महायुतीत ना. पंकजाताईंबरोबर काम करतोय, याचा मला अभिमान आहे.

पळपुट्या “ठरलंय’वाल्यांनी शेपूट घातले
“ठरलंय’वाल्यांमधील खटाव तालुक्‍यातील पळपुट्यांनी सुरुवातीलाच नांगी टाकली. येळगावकर म्हणाले, मला निभायचे नाही. घार्गे म्हणाले, मी थकलोय. निमसोडकर देशमुख म्हणाले, मी टिकणार नाही. दुसरा मायणीकर तर कोमातच गेला. हे सगळे पळपुटे जयकुमारला घाबरले. तुम्ही लढा, आम्ही गाठोडे संभाळतो, असे देशमुखांना म्हणणारे, एकमेकांचे तोंडही न पाहणारे मायणी व निमसोडकर पैसे घेऊन एकत्र आले आहेत. त्यांच्यासाठी डोकी फोडून घेणारे त्यांचे कार्यकर्ते जयकुमार गोरेंना मतदान करून “ठरलंय’वाल्यांना तोंडावर पाडणार असल्याचा विश्‍वास मान्यवरांनी व्यक्त केला.

पंकजा मुंडे यांचा व्हिडिओद्वारे संदेश
जयकुमार गोरे मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असतात. त्यांना विधानसभेत जनतेचे प्रश्‍न आक्रमकपणे मांडताना मी पाहिले आहे, असे ना. पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुडे या व्यस्त असल्याने जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ होणारी त्यांची सभा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी माण-खटावमधील जनतेला व्हिडिओद्वारे संदेश दिला. मुंडेसाहेबांवर प्रेम करणारे लोक जयकुमार यांच्या पाठीशी आहे. ते तरुण आणि कर्तृत्ववान नेते आहेत. मला त्यांच्या मतदारसंघात जाता आले नाही. मात्र, जातीपातीचे राजकारण न करता त्यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)