भाजपकडून लोकांच्या भावनांशी खेळ

आनंद शर्मा : इतिहास कधीच बदलत नसतो
मुंबई : देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था, प्रचंड वाढलेली बेरोजगारी अशा गंभीर विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते खरे बोलत नाहीत. ते भ्रामक आणि खोटा प्रचार करत आहेत. लोकांच्या भावनांशी खेळत आहेत अशी घणाघाती टिका माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी केली.

राजीव गांधी भवन येथे पत्रकारपरिषदेत ते म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था संकटात आहे, बेरोजगारी प्रचंड वेगाने वाढत आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योग धंदे बंद पडले, कारखाने बंद पडले, गेल्या पाच वर्षात काय विकास केला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान व मुख्यमंत्री देत नाहीत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा नवीन इतिहास लिहिण्याच्या गोष्टी करत आहेत. पण इतिहास कधीच बदलत नसतो, इतिहास हा इतिहास असतो.

पीएमसी खातेधारकांचे पैसे परत द्या
बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेत. भाजप सरकारच्या काळात बॅंकेतील घोटाळे आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाले. नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री यांनी ज्या हक्काने आरबीआयकडून पैसे घेतले त्याच हक्काने पीएमसी बॅंकेतील 16 लाख खातेधारकांचे पैसे त्यांना परत देण्याचे आदेश का देत नाहीत ? असा सवालही शर्मा यांनी केला. कॉंग्रेस पक्ष पीएमसी ग्राहकांच्या पाठीशी आहे, असेही शर्मा म्हणाले.

गेल्या पाच वर्षात कोणती नवीन मोठी गुंतवणूक नाही, नवीन कारखाने उभे राहिले नाहीत, नवीन उत्पादन नाही, मागणी नाही त्यामुळे पुरवठा नाही. उत्पादन क्षमता शून्याच्या खाली गेली आहे. नोटबंदी आणि जीएसटी मुळे देशावर आर्थिक संकट निर्माण झालेले आहे. भाजप सरकारकडे यासाठी कोणतीच उपाय योजना नाही. निवडणूक प्रचार संपायला अजून दोन दिवस आहेत. सरकारतर्फे कोणीही अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या या विषयांवर माझ्याशी अथवा माझ्या सहकाऱ्यांशी खुल्या चर्चेसाठी जनतेच्या समोर यावे, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले .

नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वप्नात राहू नये. भारताचा जीडीपी दर 5 टक्‍क्‍यांवर आलेला आहे. 2024 मध्ये 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यासाठी 10 ते 12 टक्के जीडीपी दर सातत्याने पाहिजे. आधीच 1,70,000 करोडचे नुकसान झालेले आहे म्हणून आरबीआयकडून केंद्र सरकारला 1, 76,000 कोटी घ्यावे लागलेले आहेत. या वर्षीच्या बजेटमध्ये 7 लाख कोटींचे नुकसान होणार आहे. अर्थमंत्र्यांनी याची कारणे आणि उत्तरे लोकांना सांगावीत, असे आव्हान देतानाच वाहन उद्योग, टेक्‍सटाईल, शेती उत्पादन यामध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे.

नरेंद्र मोदी यांना इतिहास, घटनाक्रम, अर्थव्यवस्था या गोष्टींचे फार कमी ज्ञान आहे. त्यामुळे ते नेहमी चुकीचा संदर्भ लावत असतात आणि चुकीची माहिती देत असतात. कलम 370 आणि राम मंदिर या मुद्‌द्‌यांवर ते जनतेत गैरसमज पसरवत आहेत. आपल्या देशात दोन समाज निर्माण करत आहेत. भाजप सरकार जाती धर्माच्या नावावर देशामध्ये तेढ निर्माण करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.