टोलबंदनंतरही देखभालीत दुर्लक्ष : स्थानिक, प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
सोरतापवाडी – पुणे- सोलापूर महामार्गावर हडपसरपासून कासुर्डी फाट्यापर्यंत रस्त्यावर जागोजागी कचरा साठलेला आहे. महामार्गावर स्वच्छतेची “ऐशी की तैशी’ झाली आहे. पुणे – सोलापूर महामार्ग हडपसर ते कवडीपाट हा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निधीतून तर कवडीपाट ते कासुर्डी फाटा हा आयआरबी टोल कंपनीने “बांधा वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्वावर तयार करण्यात आला आहे.
टोल वसुली सुरू होती. तेंव्हा रस्ता चांगल्या स्थितीत होता. टोल वसुली बंद होऊन तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आला. त्यानंतर नॅशनल हायवे ऍथॉरिटीकडे हस्तांतरित केला आहे. या विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. जागोजागी हा रस्ता कचराकुंडीने व्यापला आहे.
त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट जनावरे फिरत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. संबंधीत ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत.