कर्जत – कर्जत तालुक्याला क्रीडा क्षेत्रातील मोठी परंपरा लाभलेली आहे. मात्र येथे अजूनही क्रीडा संकुलाची प्रतीक्षा आहे. संकुलाचे काम कित्येक दिवसांपासून रखडलेले आहे. कुस्ती, कबड्डी आणि इतर क्रीडा प्रकारात अनेक आजी माजी खेळाडूंनी कर्जतचे नाव राज्य आणि देशपातळीवर नेले आहे.
परंतु आजही तालुका हक्काच्या क्रीडा संकुलापासून वंचित असल्याने तालुक्यात खेळाडूंची मोठी उपेक्षा होताना दिसते आहे. आघाडी सरकारच्या काळात पाच कोटी रुपये क्रीडा संकुलासाठी मंजूर झाले होते. परंतु जागा उपलब्ध होत नव्हती. यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी स्वतःच्या मालकीची पाच एकर जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर क्रीडा संकुलाच्या कामाला राशिन रस्त्यावरील पाण्याच्या टाकीमागे सुरुवात झाली.
काम सुरू झाल्याने क्रीडा संकुल साकारेल असे वाटत असताना ठेकेदारांनी काही कारणांमुळे हे काम बंद केले. ते काम आजतागायत अपूर्ण आहे. त्यानंतर 2014 ला राज्यात भाजपा- शिवसेनेचे सरकार आले. तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे क्रीडाप्रेमींनी मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी प्रयत्नही केला. डिसेंबर 2017 मध्ये राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी चषक कर्जत येथे भरविण्यात आले.
त्याचे पारितोषिक वितरण 1 जानेवारी 2018 या पालकमंत्र्यांच्या वाढदिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जतमध्ये करण्यात आले. नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी क्रीडा प्रेमींच्यावतीने मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावर जाहीर मागणी केली.मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून क्रीडा संकुलासाठी 10 कोटींची घोषणा कार्यक्रमात केली. यातून कर्जतच्या क्रीडा प्रेमींना मोठा दिलासा मिळाला, मात्र काही अडचणींमुळे हे काम प्रलंबित राहिले आहे.