मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी ऐतिहासिक निर्णय देत शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निवाडा केला. यावेळी नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटातील एकही आमदाराला आपत्र न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली जाईल असा अंदाज वर्तवला जात होता तत्पूर्वी ठाकरेंनी ‘जनता न्यायालय’ म्हणत एक पत्रकार परिषद घेतली.या परिषदेला वकिलांची मोठी फौज देखील हजर होती. यावेळी अनिल परब यांनी शिवसेनेच्या पक्ष घटनेमध्ये बदल करण्यात आलेल्या वेळेसचा व्हिडिओच सर्वांसमोर दाखवला.
२०१३ ला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. त्यात पक्ष घटनादुरुस्तीचे ठराव मांडले होते. त्याचा व्हिडीओ यावेळी पत्रकार परिषदेत दाखवण्यात आला. ज्यामध्ये सर्व शिवसेना नेते ठरावाला संमती देताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पुढील ठराव संमत करण्यात आल्याचे पाहायला मिळते.
असे होते २०१३ चे ठराव
पहिला ठराव शिवसेनाप्रमुख हे पद पक्षातल्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला लावता येणार नाही. ती संज्ञा गोठवण्यात येत आहे.
दुसरा ठराव होता की शिवसेना पक्षप्रमुखपद निर्माण करण्यात येत आहे. त्या पदी उद्धव ठाकरे असतील. ही निवड ५ वर्षांसाठी असेल.
तिसरा ठराव कार्यकारी अध्यक्ष पद रद्द करण्यात येत आहे असा होता.
चौथा ठराव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असणारे शिवसेनाप्रमुख म्हणून असणारे सर्वाधिकारी शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे देण्यात येत आहेत. पक्षाबाबतचे सर्व अधिकार त्यांच्याकडे असतील.
पाचवा ठराव म्हणजे ३१ उपनेत्यांपैकी २१ जागा निवडणूक प्रक्रियेतून तर उरलेल्या १० जागा शिवसेना पक्षप्रमुख नियुक्त करतील.
याचप्रमाणे २०१८ साली देखील शिवसेनेची पक्ष निवडणूक झाली असल्याचे व्हिडीओ यावेळी अनिल परब यांनी दाखवले.
राहुल नार्वेकरांनी यांनी उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद असंविधानिक असल्याच म्हणत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीच्या आधारे हा निर्णय देत असल्याचे नार्वेकर यांनी म्हंटले होते. मात्र या सर्व बाबी खोडून काढत पक्षातील निवडणूका संविधानिक पद्धतीने झाल्या असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले. तसेच याबाबतचे सर्व डॉक्युमेंट निवडणूक आयोगाकडे जमा केल्याचा पुरावा देखील अनिल परब यांनी दाखवला.