शहरातील 10 बेशिस्त हॉटेल, बारवर कारवाई
पुणे – राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून पुणे जिल्ह्यातील हॉटेल्स-बारवर मार्गदर्शक तत्त्वांचे (एसओपी) उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. महापालिकेने गेल्या दोन दिवसांपासून नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेलांवर कारवाई करणे सुरू केले असतानाच आता उत्पादन शुल्क कार्यालयाकडूनही कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
पुणे शहरातील 10 व ग्रामीण भागातील एक हॉटेल-बारवर उत्पादन शुल्क कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. आतापर्यंत उत्पादन शुल्क कार्याकडून पुणे जिल्ह्यातील एकूण 25 हॉटेलबारची कसून तपासणी केली गेली आहे,
त्यामध्ये जिल्ह्यातील 11 हॉटेल-बार नियम धुडकावत असल्याचे दिसून आले. प्रामुख्याने वेळेची मर्यादा न पाळणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन, कर्मचाऱ्यांकडून मास्क व ग्लोव्जचा वापर नसणे आदींचा समावेश असल्याची माहिती उत्पादन शुल्क कार्यालयाकडून देण्यात आली.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय नाही…
हॉटेल्समधील डाइन इन सेवा 5 ऑक्टोबरपासून सुरू झाली. परंतु, अजूनही काही हॉटेल व्यावसायिकांकडून करोनाचा प्रसार होऊ नये याकरिता पुरेशी खबरदारी घेण्यात येत नसल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. ही बेशिस्ती कुणालाच परवडणारी नसून वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत उत्पादन कार्याकडून मिळाले आहेत.