किरकोळ कारणावरून वादावादी
वडगाव मावळ – हॉटेलवरील जेवणासाठी गेलेल्या ग्राहकाने जेवणात मांस कच्चे असल्याची तक्रार केली. यामध्ये ग्राहक आणि हॉटेल (ढाबा) मालक यांच्यात वाद झाले. या वादातून ढाब्याच्या मालकाने ग्राहकाला बंद खोलीत डांबून बेदम मारहाण केली. कान्हे (ता. मावळ) येथील एका ढाब्यावर ही घटना घडली.
याप्रकरणी अभिषेक सुधाकर पर्णीकर (वय 30, रा. 13 विजय अपार्टमेंट, सालसबे रीक पार्क, गुलटेकडी, पुणे) यांनी रविवारी (दि. 9) वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या मारहाणीत फिर्यादी व त्याचे दोन मित्र प्रितेश पिल्ले, संकेत कांबळे (रा. गुलटेकडी पुणे) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी अप्सरा ढाबा मालक लवली सिंग (पूर्ण नाव माहीत नाही) याच्यासह 8 ते 10 (नावे माहीत नाही) जणांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 4) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास कान्हे फाटा येथे फिर्यादीसह त्याचे 2 मित्र जेवणासाठी आले होते. त्यांनी चिकन मसाला मेनूची ऑडर दिली. यामध्ये यातील मांस कच्चे असल्याच्या कारणावरून ढाबा मालक व त्यांच्या वादावादी झाल्याने ते हॉटेलमधून बाहेर निघून गेले. फिर्यादी व त्यांचे सहकारी मोटारीतून पुण्याच्या दिशेला जात असताना जुना पुणे-मुंबई महामार्गावर गुरुनानक हॉटेलसमोर बोलेरो मोटारीतून आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांच्या मोटारीसमोर मोटार आडवी लावली. त्या गाडीतील ढाबा मालकासह 8 ते 10 जणांनी फिर्यादीच्या मोटारीवर पुढील व मागील बाजूस दगडी मारून गाडीच्या काचा फोडल्या आहेत.
त्यानंतर आरोपीने त्याच्या हातातील तलवारीच्या उलट्या बाजूने, तर त्याच्या सोबत असलेल्या अज्ञात इसमांनी लाकडी दांडक्याने फिर्यादी व त्याच्या 2 मित्रांना बेदम मारहाण केली. फिर्यादीचे मित्र हे तेथून पळून गेल्यानंतर आरोपी याने फिर्यादीस जबरदस्तीने बोलेरो मोटारीत बसवून पुन्हा अप्सरा ढाब्यावर नेले. तेथे एका बंद खोलीमध्ये कोंडून ठेवत पुन्हा मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादी व त्यांचे दोन मित्र यांच्या हाताला, पायाला, डोक्याला दुखापत झाल्याने ते जखमी झाले आहेत. तसेच फिर्यादीच्या हातातील 2 सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट गहाळ झाले आहे. याप्रकरणी वडगाव पोलीस तपास करीत आहेत.