सहकारनगर – लॉकडाऊनच्या काळात रस्त्याकडेला जखमी अवस्थेत शिक्रा जातीच्या पक्ष्याचे पिल्लू आढळून आले होते. या पक्ष्याचे फोटो पक्षी तज्ज्ञांना पाठवून त्यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार त्याचा सांभाळ करण्यात आला. अखेर, गेल्या तीन, साडेतीन महिन्यांच्या कालावधी हा पक्षी “पाहुणचार’ घेत पूर्णपणे बरा झाल्याने त्यास निसर्गात सोडून देण्यात आल्याचे लोकेश बापट यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले. यातून अनेक घडामोडीही घडल्या. तसाच फटका प्राणीमात्रांनाही बसला. याच पार्श्वभुमीवर मार्च महिन्याच्या सुरुवातीला टेलस ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने तळजाई वनविहारमधील परिसरात तळजाई वनक्षेत्रात तयार करण्यात आलेल्या तळ्यात पाणी सोडले जात होते.
याच दरम्यान संस्थेचे ईश्वर कसबे व लोकेश बापट यांना रस्त्याकडेला शिक्रा जातीचे पक्ष्याचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आले. त्याला जखमी अवस्थेत घरी आणल्यानंतर किमया बापट व जान्हवी बापट यांनी त्याच्यावर उपचार करीत या पक्ष्यास ड्रॉपरने अन्नपाणी दिले.
शिक्रा हा पक्षी शिकारी असून तो मासांहारी असतो. त्यामुळे त्याला चिकन, मटण, अंडी असे पदार्थ खाण्यास देण्यात आले. आता हा पक्षी बरा झाल्याने त्यास निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले आहे.