सागर – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे कॉंग्रेसचे प्रामाणिक वॉचमन होते. त्यांना देशाची नव्हे, तर स्वतःच्या खुर्चीची अधिक चिंता होती. त्यामुळेच देश बरबाद होत गेला, अशी बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
मध्यप्रदेशातील सागर येथे निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला. मोदी म्हणाले, क्रिकेटमध्ये दिवसभराच्या खेळानंतर शेवटची एक-दोन षटके बाकी असताना एखादा खेळाडू बाद झाला तर शेवटच्या खेळाडूला मैदानात पाठवले जाते. हा खेळाडू नाइट वॉचमनचे काम करत असतो. त्यामुळे चांगल्या खेळाडूंना मैदानात पाठवले जात नाही. त्याचप्रमाणे 2004मध्ये कॉंग्रेसला सत्तेची संधी मिळाली.
सत्ता स्थापन करण्याची संधी मिळेल असे कॉंग्रेसला वाटलेही नव्हते. कारण सत्ता सांभाळण्याएवढी राजकुमाराची तयारी झाली नव्हती. कॉंग्रेसलाही त्यांच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. त्यामुळे गांधी कुटुंबाने त्यांच्याशी प्रामाणिक असलेल्या वॉचमनला सत्तेवर बसविण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटले राजकुमार आज शिकेल, उद्या शिकेल आणि सर्वच जण वाट पाहत होते. राजकुमारला भरपूर प्रशिक्षणही देण्यात आले, पण सर्व पाण्यात गेले, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांना लगाविला.