नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्यासाठी 56 पक्ष एकत्र आले. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यात फाटाफूट झाली. उत्तरेकडील राज्यांमध्ये बहुजन समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्षाची आघाडी कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते. असे असले तरी सर्व विरोधकांचे मोदींना पराभूत करणे हे एकच ध्येय असून योग्य वेळी सर्व विरोधक एकत्र येतील, असा विश्वास कॉंग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडालेला आहे. कॉंग्रेस आणि भाजपकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, दिल्ली या ठिकाणी सपा, बसपा आणि आपकडून कॉंग्रेसला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पित्रोदा यांनी मुलाखतीत आपले मत व्यक्त केले आहे.
पित्रोदा म्हणाले, लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसने प्रत्येक राज्यातील परिस्थीतीनुसार लढण्याचा निर्णय घेतला असल्याने काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांशी आघाडी होवू शकली नाही. पण सर्व विरोधी पक्ष एकमेकांच्या संपर्कात आहेत. गरज पडल्यात ते एकत्र येतील, असे त्यांनी सांगितले. मात्र, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंतप्रधानच्या उमेदवारीबाबत बोलण्याचे टाळले आहे.
सर्व विरोधकांचे ध्येय एकच आहे, सर्वांना लोकशाही आणि शांतता हवी आहे. त्यामुळे योग्यवेळी सर्व विरोधक एकत्र येतील. त्यात सप व बसपासोबत काम करण्याची शक्यता खुली असल्याचे त्यांनी सांगितले.