पुणे – शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांचा जैन समाजातर्फे “समाजरत्न पुरस्कार’, तर वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय काम केल्याबद्दल पूना हॉस्पिटलचे देविचंद जैन यांनाही समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कॉंग्रेसचे नेते तथा माजी आमदार उल्हास पवार, अनुष्ठान आराधिका प. पु. डॉ. कुमुद लताजी म.सा., शोभाताई रसिकलाल धारिवाल, श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ बिबेवेवाडीचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माणिकचंद दुगड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होती.
त्यावेळी पवार म्हणाले, “अनेक जण समाजासाठी आपला बहुमूल्य वेळ, ज्ञान, अनुभव व वेळप्रसंगी पैसेदेखील खर्च करतात. याचा फायदा समाजातील गरजू व्यक्तींना होत असतो. यासाठी ते आपले सर्व आयुष्य पणाला लावतात. त्यामुळे ते खास होतात. अशा खास व्यक्तींचा परिचय समाजाला होणे गरजेचे आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याला दिलेली एक प्रकारची पावती असते.’
तर “समाजासाठी आयुष्य पणाला लावण्याच्या सेवाभावी व्यक्तींचा सत्कार करण्याने त्यांचे मनोबल वाढते आणि इतरांना प्रेरणा मिळते,’ असे उद्गार डॉ. कुमुद लताजी यांनी यावेळी काढले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.