पिंपरी (प्रतिनिधी) – किराणा दुकानदाराशी भांडण करणाऱ्या टोळक्याला समजावून सांगणाऱ्या होमगार्डला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना घरकुल चिखली येथे रविवारी (दि. 27) दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार घरकुल चिखली येथील एका किराणा दुकानासमोर काहीजण सिगारेट ओढत होते. त्यामुळे दुकानदाराने त्यांना बाजूला जाण्यास सांगितले. यावरून टोळके त्या दुकानदाराशी वाद घालू लागले. त्या वेळी तेथून जाणाऱ्या एका होमगार्डने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, टोळके होमगार्डशी वाद घालून अंगावर धावून आले.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1222121968127506/
त्यामुळे होमगार्डने स्वतःच्या बचावासाठी एका तरुणाला काठी मारून ढकलले. यामुळे संतापलेल्या टोळक्याने थेट होमगार्डवर हल्ला केला. त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. होमगार्डला मारहाण करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.