पिंपरी (प्रतिनिधी): रस्त्याने जाताना एकजणास थुंकताना पोलिसांनी पाहिले. अधिकाऱ्याने गाडी थांबवून त्या तरुणाला रस्त्यावर ज्या ठिकाणी थुंकला होता ती जागा स्वतःच्या रुमालाने साफ करायला लावली. ही घटना पिंपरीतील मोरवाडी चौक येथे रविवारी (दि. 24) दुपारी घडली.
पिंपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र निकाळजे हे रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास काही कामानिमित्त पिंपरीतील साई चौकाकडे चालले होते. ते मोरवाडी, पिंपरी येथे आले असता त्यांना एकजण रस्त्यावर थुंकताना दिसला. त्यांनी चालकास गाडी बाजूला घेण्यास सांगितली. सध्या करोनाची साथ असल्याने तू रस्त्यावर का थुंकला अशी विचारणा केली.
मात्र, पोलिसांना पाहताच त्या तरुणाची बोबडीच वळाली. आपण पुन्हा असे करणार नाही, असे म्हणत तो गयावया करू लागला. त्यामुळे पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी त्या तरुणास त्याच्याच रुमालाने थुंकलेली जाग साफ करण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या पिंपरी-चिंचवड शहरात चांगलाच व्हायरल झाला असून, पोलिसांनी केलेल्या शिक्षेचे कौतुक होत आहे.