प्रेमप्रकरणे, अफेअर्स, ब्रेकअप्स, रिलेशनशिप हे सारं सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांच्या बाबतीत सदोदित घडत असतं. यातील प्रत्येकाची चर्चा माध्यमातून होत असते. खास करुन ब्रेकअप्सची ! बहुतेक वेळा ब्रेकअप झाल्यानंतर ते कलाकार एकमेकांचे तोंडही बघणे पसंत करत नाहीत. एका चित्रपटात झळकत नाहीत. पण असे उदाहरण पाहिले आहे का, ज्यामध्ये ब्रेकअप झालेल्या एकाचे दुसऱ्याबरोबर जुळताना दिसत आहे; पण अचानक काही तरी घडते आणि पुन्हा जुन्या साथीदारासोबतच सूर जुळवून घ्यावेसे वाटतात…
असे घडले आहे हॉलीवूडमध्ये! त्याचं झालं असं… काही दिवसांपूर्वी हॉलीवूड अभिनेत्री जेनिफर एनिस्टनला सेन्ड्रा बुलॉकसोबत आनंदात फिरताना, गप्पा मारताना अनेकांनी पाहिलं होतं. त्यावेळी या दोघी जेनी आणि ब्र्रॅड पीट यांच्या नात्याविषयी चर्चा करत असल्याचे बोलले गेले. या दोघांचे भविष्य कसे असेल असा त्यांच्या चर्चेतील विषय होता.
दोघांचीही सर्व स्वप्नं साकार होतील, आनंदी वातावरण असेल, काचेचं घर असेल, घरातून चमचमीत पदार्थांचा सुगंध दरवळत असेल, अंगाखांद्यावर मुलं खेळत असतील अशा प्रकारच्या आयुष्याची चर्चा सुरु होती. याचं कारण जेनी पुन्हा एकदा ब्रॅड पिटसोबत संसार थाटायच्या विचारात आहे. याविषयी तिने सेन्ड्राला बरंच काही सांगितलंही आहे म्हणे! ब्र्रॅडसोबतच्या नात्यामध्ये घनिष्ठता आली आहे. त्यामुळंच तिला आपलं जुनं प्रेम पुनरुज्जीवित करायचं आहे. तिला आपली जुनी कहाणी नव्यानं सुरू करायची आहे. पाहूया पुढं काय काय घडतंय ते…! हॉलीवूडसाठी अशा कहाण्या नव्या नाहीत…