विधानसभेसाठी नगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघासाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र, पहिल्या दिवशी केवळ शेवगावमधून एक अर्ज दाखल झाला. तर 137 जणांनी 202 अर्ज नेले आहेत.पितृपंधरवडा व अमावस्या यामुळे कोणीही अर्ज दाखल केला नाही. त्यात आता शनिवार व रविवार दोन दिवस प्रशासकीय सुट्टी आहे. त्यामुंळे आता सोमवारीच अर्ज विक्री व दाखल होतील. त्यात पुन्हा दि.2 ऑक्टोबरची महात्मा गांधी जयंतीची सुटी आहे. त्यामुळे सोमवार, मंगळवार, गुरुवार व शुक्रवार या चार दिवसांतच अर्ज विक्री व भरता येणर आहे.
पहिल्या दिवशी प्रामुख्याने मंत्री राधाकृष्ण विखे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार बाळासाहेब मुरकुटे, शंकरराव गडाख, नगराध्यक्ष विजय वहाडणे, सत्यजित कदम, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, नगर शहरचे माजी शिवसेना प्रमुख संभाजी कदम यांनी अर्ज नेले आहेत. दि.5 ऑक्टोबर रोजी छाननी, तर दि.7 ऑक्टोबरपर्यंत माघारीची मुदत आहे. त्याच दिवशी चिन्हवाटप होईल. दि. 8 ते 21 ऑक्टोबरपर्यंत प्रचार करता येणार आहे. यात खुल्या वर्गासाठी 10 हजार, तर आरक्षित वर्गासाठी 4 हजार रुपये अनामत रक्कम आहे. उमेदवाराचा प्रचार खर्च 28 लाखांपर्यंत मर्यादित असून त्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडावे लागणार आहे. उमेदवाराने विहित नमुन्यात खर्च दररोज निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे.