नगर – एसटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नगर विभागाच्या वतीने सर्जेपुरा, कोठला येथील अहमदनगर एसटीच्या विभागीय कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. एसटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निदर्शनाने विभागीय कार्यालयाचा परिसर दणाणून निघाला.
या आंदोलनात संघटनेचे सचिव गोरख बेळगे, अध्यक्ष बलभीम कुबडे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार खुशालसिंग परदेशी, कॉ.आनंदराव वायकर, उत्तम रणसिंग, विठ्ठल देवकर, कैलास ढुमणे, सावंत, मोकाटे, डहाळे, रोहोकले, मोहित बागडे, दहिफळे, गाजरे, पठारे, यादव, ताकटे, गाडे, कर्डिले, केळकर आदींसह जिल्ह्यातील एसटी सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.
एसटी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक 19 डिसेंबर 2019 रोजी औरंगाबाद येथे झाली होती. या उच्चाधिकार समितीच्या बैठकीमध्ये एसटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने दि.23 जानेवारी रोजी राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर अहमदनगर एसटीच्या विभागीय कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. एसटी पास साठी विधवा महिलांची वयाची अट 75 वरुन 65 न करता पुर्वी प्रमाणे ठेवावी, तसेच विधवांनाही सहा महिन्याच्या पासेसची सुविधा मिळावी, सेवानिवृत्त कामगारांच्या पेन्शन व अनपेड रक्कम संदर्भात माहिती मिळावी, करार फरक मिळावा, बसची संख्या कमी असल्याने पासधारक कर्मचाऱ्यांना सर्वच गाड्यांमधून प्रवास करण्याची सवलत द्यावी, पासची मुदत जानेवारी ते डिसेंबर अशी ठेऊन दोन दोन महिन्यांचे तीन पास द्यावेत, चालकांचे वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असतानाही स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज घेऊन त्यांना कुठलेही लाभ दिले जात नसून, त्यांना तातडीने लाभ द्यावे, उपदान ग्रॅच्युइटीची रक्कम त्वरित मिळण्यासह इतर प्रश्नांची सोडवणुक करण्याबाबत आंदोलन करण्यात आले.